वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊनमुळे महावितरणच्या घरगुती, वाणिज्यसह इतर सर्वच वर्गवारीतील वीज ग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी मीटरचे स्वतः रिडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ऍपवर अपलोड करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने मार्च महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी 15 मे, तर एप्रिलचे वीजबिल भरण्यासाठी 31 मे ही अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न महावितरणमार्फत करण्यात आला आहे. महावितरणकडून 23 मार्चपासून मीटरचे रिडिंग घेणे, वीजबिलांची छपाई व वितरणही बंद करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वीजबिल भरणा केंद्रही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे महावितरणच्या कंझ्युमर्स पोर्टलवरून किंवा मोबाईल ऍपमधील लॉगिनद्वारे वीजग्राहकांना मीटरचे रिडिंग अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रिडिंग घेऊन (सेल्फ मीटर रिडिंग) पाठवावे, असा एसएमएस मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना पाठविण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
वीज ग्राहकांनी स्वत:च मीटर रिडिंग घेऊन पाठविल्यास त्यांना प्रत्यक्ष वापरानुसार वीजबिल देणे शक्मय होणार आहे. जे ग्राहक स्वत:चे मीटर रिडिंग पाठविणार नाहीत, त्यांना सरासरी वीजबिल पाठविण्यात येणार आहे. पुढील कालावधीत महावितरणकडून प्रत्यक्ष मीटर रिडिंग घेतल्यानंतर या ग्राहकांना अचूक वीजबिल आकारण्यात येणार आहे. मागील सरासरी वीजबिलांचे समायोजन करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे वीजबिल पाठविण्यात येणार आहे. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांनी घर बसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.