कळणे मायनिंग दुर्घटनाप्रकरणी आमदार केसरकर यांचे आदेश : सद्यस्थितीत मायनिंग कामे पूर्णतः बंदच्याही सूचना
वार्ताहर / दोडामार्ग:
मायनिंगमुळे कळणे गावात जी काही मानवनिर्मित आपत्ती ओढवली, ती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे मायनिंग ज्यांच्या नावावर आहे, त्यांच्यावरच फक्त गुन्हा दाखल करून न थांबता सदर मायनिंग जो कोणी चालवत आहे, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांना दिले. तसेच सद्यस्थितीत या मायनिंगची सर्व कामे पूर्णपणे बंद करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
आमदार केसरकर यंनी शनिवारी कळणे येथे भेट दिली. त्यांनी बांधफुटीने प्रभावित झालेल्या शेतकरी, ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचप्रमाणे नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱयांसमवेत आढावा बैठक घेत सूचनाही केल्या.
तातडीने कार्यवाही करा – आमदार केसरकर
मायनिंगमुळे जी काही हानी झाली, त्याचे नुसते पंचनामे करून थांबू नका. पुढील 20 ते 25 वर्षे उत्पन्न देणारी आमची शेती-बागायती तसेच ज्या जमिनीत आम्ही दरवर्षी शेती करणार होतो, ती जमीनही मायनिंगमुळे नापीक झाली आहे. त्यामुळे आम्हाला दहापट नुकसान भरपाई द्या, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मायनिंगमुळे आमची नदी दूषित झाली आहे. गावच्या नळपाणी व विहिरीद्वारे होणाऱया पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे. त्याकडेही केसरकर यांचे लक्ष वेधण्यात आले. तेव्हा केसरकर यांनी बैठकीला उपस्थित असलेले गटविकास अधिकारी मिलिंद जाधव व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना दूषित झालेल्या विहिरींना पंप लावून उपसा करा तसेच त्यामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करून पाणी पिण्यासाठी योग्य करा. शिवाय सध्या ग्रामस्थांच्या सोयीसाठी वीस लिटरचे पाण्याचे जार तात्काळ पूरवा. सर्व शेतकरी-ग्रामस्थांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा, असे आदेश आमदार केसरकर यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ, तालुका कृषी अधिकारी स्नेहा शेटे, जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जि. प. सदस्य संपदा देसाई, उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, पं. स. सदस्य धनश्री गवस, मिलिंद नाईक, भिवा गवस, रामदास मेस्त्राr, सज्जन धाऊस्कर, भगवान गवस आदी उपस्थित होते.
लीजिंग-ड्रेसिंग दोघांवरही गुन्हा दाखल करा!
दरम्यान आढावा बैठक सुरू असताना आमदार केसरकर म्हणाले, लीजिंग व ड्रेसिंग अशा दोघांवरही गुन्हा दाखल करा. लिजिंग म्हणजेच ज्यांच्या नावावर मायनिंग कंपनी आहे असे तर ड्रेसिंग म्हणजे सदर मायनिंग चालविणारा. त्यामुळे मायनिंग मालकाप्रमाणे मायनिंग चालविणारही तेवढाच दोषी आहे. त्यामुळे फक्त लीजिंगवाल्यावरच गुन्हा दाखल न करता ड्रेसिंगवाल्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना आमदार केसरकर यांना केल्या. त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे खनिकर्म व वन विभागाच्या अधिकाऱयांनी एकत्रित पाहणी करावी व त्याप्रमाणे आपणास या घटनेचा इत्यंभूत अहवाल द्यावा, असेही आमदार केसरकर म्हणाले.
बुधवारी घेणार खनिकर्म मंत्र्यांची भेट
या मागणीमुळे आतापर्यंत किती अपघात झाले, या मायनिंग कंपनीने प्रशासनाने दिलेल्या नियमांची, अटी-शर्तीची कशाप्रकारे पायमल्ली केली, आदींची सविस्तर माहिती आपण येत्या बुधवारी खनिकर्म मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तरपणे सांगणार आहे. तसेच या घटनेमुळे ही मायनिंग बंद व्हावे, यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचेही केसरकर म्हणाले.