मार्च अखेरपर्यंत 44 कोटी 15 लाख घरपट्टी जमा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील वर्षी 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे होते. शंभर टक्के मालमत्ता कर वसूल करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला होता. पण वसुली मोहीम राबविण्यात आली नसताना देखील महापालिकेच्या खजिन्यात 44 कोटी 15 लाख रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षात 88 टक्के घरपट्टी वसुली झाली आहे. तसेच 2022-23 या आर्थिक वर्षातील घरपट्टी भरणाऱयांना पाच टक्के कर सवलत देण्यात येणार आहे.
मागील वर्षी 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे होते. शंभर टक्के मालमत्ता कर वसूल करण्याचा आदेश महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना दिला होता. पण त्यांच्यावर पदवीधर मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने घरपट्टी वसुलीचे काम करण्यात अडथळा निर्माण झाला होता. परिणामी महापालिकेला शंभर टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. यामुळे सध्या 44 कोटी 15 लाख रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे.
मागीलवषी कोरोना उद्रेकामुळे मार्च महिन्यात क्लोजडाऊन आणि नंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी घरपट्टी जमा करता आली नाही. सर्व व्यावसायिकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. पण घरपट्टी भरणाऱयांना देण्यात येणाऱया पाच टक्के कर सवलतीच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याने बहुतांश मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली आहे. एरवी घरपट्टी वसुलीसाठी मनपाकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱयांच्या पथकांची नियुक्ती करण्यात येते. पण यंदा पथकाच्या माध्यमातून घरपट्टी वसुली मोहीम न राबविताही 44 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. 2022-23 आर्थिक वर्षात 50 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मालमत्ता कर भरणाऱया मालमत्ताधारकांना दि. 1 ते 30 एप्रिल दरम्यान पाच टक्के सवलत देण्यात येते. यामुळे यंदा एप्रिल महिन्यात किमान पंधरा कोटीहून अधिक मालमत्ता कर वसूल होण्याची शक्यता आहे.