प्रतिनिधी/ बेळगाव
मालमत्ताधारकांनी खोटी माहिती देऊन मालमत्ता कर बसवून घेतला असल्याची बाब निदर्शनास आल्याने मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली होती. ही मोहीम मागील वर्षभरापासून बंद पडली असल्याने फेरसर्वेक्षणाचे काम रखडले आहे. परिणामी महापालिकेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
शहरातील मालमत्तांचे अचूक मोजमाप करून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. मोहीम राबवत असताना रहिवासी आणि व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण करून चलन देण्यात आले होते. मात्र, मालमत्ताधारकांनी कमी जागा दाखवून कर बसवून घेतला असल्याची बाब मोहिमेदरम्यान चव्हाटय़ावर आली आहे. मोहिमेमुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱयांचा गैरकारभार चव्हाटय़ावर आला होता.
महापालिकेच्यावतीने 2002-03 आर्थिक वर्षापासून स्वयंघोषित मालमत्ता कर आकारणी प्रणालीनुसार करण्यात येते. पण काही मालमत्ताधारक अद्यापही जुन्या करप्रणालीनुसार कर भरणा करत आहेत. स्वयंघोषित कर आकारणी प्रणालीनुसार कर भरत नसल्याने मालमत्ताधारकांकडे 13 वर्षांपासूनचा कर थकला आहे. यामुळे थकीत मालमत्ता कर वसुलीसह मालमत्तांचे मोजमाप करण्याकरिता महापालिकेने 2016 पासून विशेष फेरसर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती.
शहर आणि उपनगरात असंख्य मालमत्ताधारकांनी कर चुकविण्यासाठी खोटी माहिती देऊन कर बसवून घेतला असल्याचे निदर्शनास आले होते. या गैरकारभारामध्ये वॉर्ड क्लार्क आणि महसूल विभागाच्या आधिकाऱयांचा हात असल्याच्या तक्रारी महापालिका सभागृहात करण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे कर गळतीचे प्रमाण वाढले असल्याने फेरसर्वेक्षण करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली होती. त्यामुळे कर गळती रोखण्यासाठी सर्वेक्षण करून सर्व मालमत्ताधारकांचे मोजमाप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. सदर मोहिमेअंतर्गत शहरात फेरसर्वेक्षण करून नव्याने मालमत्ता कर बसविण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेच्या महसुलात वाढ झाली होती. फेरसर्वेक्षण करण्यासाठी वॉर्ड क्लार्क आणि महसूल निरीक्षकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे पाच हजार मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र पीआयडी क्रमांक देण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर फेरसर्वेक्षणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे.