डॉ. वेदांगी मोरजकर-केनवडेकर यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्कार
प्रतिनिधी / मालवण:
मालवणची सुकन्या डॉ. वेदांगी मोरजकर-केनवडेकर यांचा गोवा शासनाने कोरोना काळात रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा देऊन सेवा केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डॉ. वेदांगी यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. त्यांनी मालवण शहरातही रुग्णसेवा केली होती. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. वेदांगी दामोदर मोरजकर-केनवडेकर या येथील टोपीवाला हायस्कूल येथे बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन पोद्दार कॉलेज, मुंबई येथे बी. ए. एम. एस. करून आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून पदवी मिळविली. पालघर जिल्हय़ात इन्टर्नशिप करून त्या मालवणमध्ये आल्या. काही दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयात डॉ. शिल्पा झाटय़े यांच्यासोबत, तर दोन वर्षे डॉ. विवेक रेडकर यांच्या हॉस्पिटलमध्येही त्यांनी सेवा बजावली होती.
मालवण-गोवामधील दूत
डॉ. वेदांगी यांचा दामोदर मोरजकर यांच्या बरोबर विवाह होऊन त्या गोवा येथे स्थायिक झाल्या. गोवा येथे मार्शेल व आमोणे येथे त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. त्यांचे वडील आणि मालवण शहरातील प्रसिद्ध व्यापारी कै. प्रतापराव केनवडेकर यांच्याकडून जनसेवेचे बाळकडू मिळाल्यामुळे गोरगरिबांचा डॉक्टर म्हणून त्यांनी अल्पावधीतच प्रसिद्धी मिळविली. गोवा-बांबोळी हॉस्पिटलमध्ये मालवणातून पाठविलेल्या रुग्णांची विशेष व्यवस्था करून देण्यासाठी त्या वेळोवेळी मदत करतात. कोविड काळात रुग्णांना तपासणे, सेवा पुरविणे, मार्गदर्शन करणे अशी अहोरात्र सेवा त्या देतात. याची गोवा सरकारने दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून त्यांचा विशेष सत्कार केला.