फार्मसी कृती समितीने पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष
डी-फार्म, बी-फार्म दोन्हींची आहे गरज!
प्रतिनिधी / मालवण
येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे शासकीय फार्मसी कॉलेज सुरू करण्याची मागणी फार्मसी कृती समितीतर्फे पालकमंत्री उदय सामंत यांची शुक्रवारी भेट घेऊन करण्यात आली. दरम्यान, संघटनेच्या शिष्टमंडळाला हे कॉलेज शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे, अशी माहिती कृती समितीचे जिल्हा संघटक व मालवण तालुकाध्यक्ष राहुल परब यांनी दिली.
जिल्हा दौऱयावर आज आलेल्या पालकमंत्र्यांची फार्मसी कृती समितीने भेट घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष माईन हवालकर, कार्याध्यक्ष गोविंद पालकर, संघटक राहुल परब उपस्थित होते. संघटनेने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उपलब्ध असलेली साधनसामुग्री आणि असलेल्या व्यवस्थेची माहिती पालकमंत्र्यांना दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गात होत असताना फार्मसी कॉलेजही सुरू होणे आवश्यक असल्याची बाजू त्यांनी पटवून दिली.
बी. फार्मसी – डी. फार्मसी सुरू व्हावे
जिल्हय़ात आज एकमेव शासकीय शिक्षण देणारे कॉलेज म्हणजे शासकीय तंत्रनिकेतन मालवण. पण हे तंत्रनिकेतन स्थापन झाल्यापासून शासकीय फार्मसी कॉलेज स्थापन झाले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्यासाठी रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा, मुंबई, पुण्याशिवाय पर्याय नाही. गरीब मुलांना आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे होत असताना शासकीय फार्मसी कॉलेज मालवण येथे होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.
सकारात्मक विचार होईल – पालकमंत्री
मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये व्यवस्था होत असेल, तर त्याठिकाणी फार्मसी कॉलेज सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक विचार करू, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. यासाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधींचीही भेट घेऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.