कोरोनाचे नियम पाळून पर्यटकांचे सुरक्षित आदरातिथ्य
प्रतिनिधी / मालवण:
ख्रिसमस, विकेंडला मोठय़ा संख्येने पर्यटक मालवणात दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या गर्दीने समुद्र किनारे फुल्ल झालेत. पर्यटन व्यावसायिकांकडून कोरोना खबरदारी नियमांचे पालन करत सुरक्षितरित्या पर्यटकांचे आदरातिथ्य केले जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही पर्यटकांची पहिली पसंती मालवण ठरत आहे.
गेले आठ महिने कोरोना काळात मालवणचे पर्यटन ठप्प होते. पर्यटन व्यावसायिक संकटात सापडले होते. मालवणच्या अर्थकारणावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात मिशन बिगिन अनलॉक अंतर्गत हॉटेल व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक सुरू झाली. काही दिवसांपूर्वी सागरी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली. त्यामुळे मालवणच्या पर्यटनास पुन्हा एकदा गती प्राप्त झाली असून व्यावसायिक वर्ग सुखावला आहे. मालवणात कोरोनाचा प्रादुर्भावही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. मास्क व सोशल डिस्टन्स नियमांचे पालन पालिका व पोलीस प्रशासन कठोरपणे करत आहे. याचा परिणाम म्हणून मालवणात कोरोनाचा शिरकाव कमी आहे. यामुळे पर्यटकांची पसंती मालवण ठरत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हाऊसफुल्ल ही स्थिती नसली, तरी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यात वृद्ध व लहान मुलांचा सहभागही आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, पॅरासेलिंगचा आनंद पर्यटक मोठय़ा प्रमाणात लुटत आहेत. मालवणी जेवणावरही पर्यटक ताव मारत आहेत. एकूणच पर्यटकांनी ख्रिसमस, विकेंडला मालवणला पसंती दिली आहे. मालवण शहर, बंदर जेटी, चिवला बीच यासह दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग येथे सागरी पर्यटन व समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या घुमडे येथेही निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन सफरीला पर्यटक प्राधान्य देत आहेत.
रॉक गार्डन ‘फाउंटन’ आकर्षण
मालवण पालिकेतर्फे रॉक गार्डन येथे नव्याने म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. कलरफुल्ल लाईटिंग व म्युझिकच्या तालावर उडणारे फवारे यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रात्री उशिरापर्यंत गर्दी करत आहेत. या ठिकाणीही मास्क व सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले असून सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे. domCompleteDuration