भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी व शेवटची कसोटी आजपासून, विराटच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आघाडी मजबूत, दुखापतीमुळे जलद गोलंदाज सिराज संघातून बाहेर
वृत्तसंस्था /केपटाऊन
करिष्माई कर्णधार विराट कोहली ताज्या दमाने संघात दाखल होत असताना भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 दशकातील पहिलावहिला ऐतिहासिक मालिकाविजय संपादन करण्याचे लक्ष्य असणार आहे. उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी आजपासून (मंगळवार दि. 11) खेळवली जाणार असून त्यात विराटसेना विजयासाठी अर्थातच महत्त्वाकांक्षी असेल. पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
यापूर्वी जोहान्सबर्गमधील दुसऱया कसोटी सामन्यात विराट कोहली पाठदुखीमुळे खेळू शकला नव्हता आणि दक्षिण आफ्रिकन संघाने संघर्षमय खेळ साकारत विजय संपादन केला. सध्या ही मालिका 1-1 अशा बरोबरीत असून आपली 99 वी कसोटी खेळणाऱया विराटला नवा माईलस्टोन खुणावत असणे साहजिक आहे. जलद गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त असल्याने येथे खेळू शकणार नाही, असे विराटने स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 दशकातील पहिलावहिला मालिकाविजय संपादन करता आला तर विराटसाठी ते या प्रतिकूल कालावधीत विशेष महत्त्वाचे असेल आणि यासाठी या लढतीत पहिल्या डावात 300 पेक्षा अधिक धावा जमवणे हे पहिले लक्ष्य असणे भाग आहे.
संघातील अनेक खेळाडूंची केवळ हजेरी देखील स्फूर्ती देणारी असते आणि विराट हा त्यापैकी एक आहे. तो फलंदाजी करत असेल किंवा क्षेत्ररक्षणात असेल, त्याची केवळ हजेरी देखील संघसहकाऱयांना प्रेरणा देणारी ठरत आली आहे. याचमुळे, मागील 2 वर्षात एकही शतक झळकावता आले नसले तरी विराटचा करिष्मा जैसे थे आहे.
विहारीचे स्थान धोक्यात
हनुमा विहारीने जोहान्सबर्ग कसोटीतील दुसऱया डावात नाबाद 40 धावांची लक्षवेधी खेळी साकारली होती. पण, आता विराट कोहली परतत असल्याने विहारीला संघाबाहेर जावे लागेल, हे जवळपास निश्चित आहे. दुखापत नसेल तर रहाणे-पुजारा यांचे स्थान अबाधित राहणार, असे संकेत व्यवस्थापनाकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत. गोलंदाजीच्या आघाडीवर, जसप्रित बुमराहकडून तेजतर्रार, तिखट माऱयाची अपेक्षा असेल.
इशांत शर्मा पुनरागमनासाठी सज्ज?
पुजारा व रहाणे यांच्याप्रमाणेच इशांत शर्मा देखील आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात असून सिराज खेळणार नसल्याने इशांतचा सहभाग जवळपास निश्चित मानला जातो. मागील 6 महिन्यात इशांतला अजिबात सातत्य राखता आलेले नसून यामुळे मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेल्याचे चित्र राहिले. मात्र, सिराज खेळणार नसल्याने उमेश यादवऐवजी इशांतला संधी मिळू शकेल, असा होरा आहे.
अश्विनच्या योगदानाची विराटकडून प्रशंसा
रविचंद्रन अश्विनने दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाची उत्तमरित्या कसर भरुन काढली असून तो कोणत्याही वातावरणात अष्टपैलू खेळाडू म्हणून उत्तम योगदान देऊ शकतो, असे भारतीय कर्णधार विराट कोहली सोमवारी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
‘रविंद्र जडेजाची उपयुक्तता सर्वज्ञात आहे. त्याचे योगदानही लक्षवेधी आहे. मात्र, सध्या अश्विन ही भूमिका चोख पार पाडत आहे. अश्विनला आपल्या खेळाची उत्तम जाण आहे आणि फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर तो सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करत आला आहे’, असे विराट पुढे म्हणाला.
यापूर्वी, जोहान्सबर्गमधील दुसऱया कसोटी सामन्यात अश्विनने 50 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले आणि हंगामी कर्णधार केएल राहुलनंतर (50) संघातर्फे तोच डावात सर्वोच्च धावा जमवणारा भारतीय फलंदाज ठरला. गोलंदाजीत अश्विनला पहिल्या डावात एकही बळी घेता आला नाही. दुसऱया डावात त्याने 11.4 षटकात 26 धावात 1 बळी, असा टिच्चून मारा केला.
अष्टपैलू रविंद्र जडेजा यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत उजव्या हाताच्या दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला. अगदी दक्षिण आफ्रिका दौऱयातही तो खेळू शकला नव्हता.
अजिंक्य रहाणे-पुजाराकडून आणखी भरीव खेळीची अपेक्षा
मधल्या फळीतील अनुभवी शिलेदार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना शानदार अर्धशतके झळकावल्याने आणखी एक लाईफलाईन मिळाली असली तरी कारकीर्द वाचवण्यासाठी एकच अर्धशतक पुरेसे नसेल, हे स्पष्ट आहे. येथे मोक्याच्या क्षणी या उभयतांनी मोठी खेळी साकारली तर ते संघाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे असेल. आग ओकणारा मारा करण्याची क्षमता असलेल्या रबाडासारख्या कसलेल्या गोलंदाजांविरुद्ध सलामीवीर केएल राहुल व मयांक अगरवाल यांचीही कसोटी लागू शकते.
विराट कव्हर ड्राईव्हचे अनाठायी फटके टाळणार का?
विराट कोहलीला अलीकडील कालावधीत कव्हर ड्राईव्हच्या आवडत्या फटक्यावर सातत्याने आपली विकेट गमवावी लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर, 2004 मध्ये सचिन तेंडुलकरने सिडनी कसोटीत ज्याप्रमाणे ब्रेट लीविरुद्ध ऑफ साईडचा एकही फटका खेळला नाही, त्याप्रमाणे विराट येथे असे अनाठायी फटके टाळणार का, याची येथे उत्सुकता असेल. अर्थात, रविवारमधील सराव सत्रात विराटने सातत्याने कव्हर ड्राईव्हच्या फटके घोटवले, ते पाहता तो आपल्या शैलीला मुरड घालणार नाही, असेच संकेत आहेत. न्यू लँड्सची येथील खेळपट्टी उसळत्या गोलंदाजीला पोषक असेल. त्यामुळे, भारतीय फलंदाज कॅगिसो रबाडा, ऑलिव्हिएर, एन्गिडी व जान्सन यांना कसे सामोरे जातात, ते पाहणे देखील औत्सुक्याचे असणार आहे. 2010-11 च्या मालिकेत सचिन-डेल स्टीन यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली होती, ते ही उल्लेखनीय आहे.