बहरातील फलंदाजांकडून पुनरावृत्तीची व लंकेकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ कोलकाता
आघाडीच्या तीन फलंदाजांना फॉर्म गवसल्यामुळे उत्साहित झालेला भारतीय संघ व लंका यांच्यातील दुसरा वनडे सामना आज गुरुवारी येथे होत असून हा सामना जिंकत मालिकविजय निश्चित करण्यास भारतीय संघ उत्सुक झाला आहे. दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मध्ये पहिले शतक नोंदवून तीन वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणल्यानंतर कोहलीने तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही, विशेषतः व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये. त्याने मंगळवारी गुवाहाटीत झालेल्या लंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 73 वे आंतरराष्ट्रीय शतक नेंदवले आणि भारताने हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. दोन जीवदानाचा लाभ घेत त्याने वनडेतील लागोपाठच्या सामन्यात शतक नोंदवले. त्याचे शतक व अन्य दोघांची अर्धशतके यांच्या बळावर भारताने 7 बाद 373 धावा जमविल्या. त्याने लंकन गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व राखत शानदार शतक नोंदवले, त्यावेळी त्याच्या जुन्या खेळाची आठवण ताजी झाली.
दुखापतीतून परतलेल्या कर्णधार रोहित शर्मानेही मॅचप्रॅक्टिस नसूनही दमदार फलंदाजी करीत 83 धावांची खेळी करताना गिलसमवेत जवळपास दीडशतकी सलामी देत विजयाचा भक्कम पाया रचला. आठ वर्षांपूर्वी या दोन संघांत येथे झालेल्या शेवटच्या लढतीत रोहितने 264 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती. ईडन गार्डन्स हे त्याचे आवडते मैदान असल्याने आणखी एका मोठी खेळी करण्याचा त्याचा इरादा असेल. रोहितला वनडे शतकानेही बराच काळ हुलकावणी दिली असून जानेवारी 2020 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक नोंदवले होते. त्यामुळे ही बाबही त्याच्यासाठी प्रेरणादायक ठरू शकेल.
शुबमन गिलही वनडेमध्ये उत्तम फॉर्ममध्ये असून पहिले तीन फलंदाज स्थिरावल्यामुळे लंकेच्या सुमार गोलंदाजांवर ते पुन्हा एकदा वर्चस्व गाजविण्याची अपेक्षा आहे. कर्णधाराच्या पाठिंब्यामुळे त्याला इशान किशनच्या जागी सलामीवीराच्या जागी पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र इशानला वगळल्याबद्दल कर्णधारावर बरीच टीका झाली होती. गिलने 70 धावांची शानदार खेळी करीत सर्वांची तोंडे बंद केली आणि मागील वर्षीचा फॉर्म त्याने कायम राखला. मागील वर्षी त्याने 12 डावात 70 हून अधिक धावांची सरासरी राखली होती.
श्रेयस अय्यरनेही मागील वर्षीच्या ड्रीम रनमधून पुन्हा खेळण्यासाठी आला आहे. स्पिनर्सचा यशस्वी मुकाबला करणे आणि स्ट्राईक रोटेट करण्याची क्षमता यामुळे त्याने चौथे स्थान पक्के केले असल्याने केएल राहुलची एकमेव जागा खुली आहे. राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याला ही मालिका पूर्ण खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे इशानला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
गोलंदाजीत मोहम्मद सिराजने नव्या चेंडूवर भेदक कामगिरी करीत आपला दावा भक्कम केला आहे. त्याने पाटा खेळपट्टीवर पहिल्या 5 षटकांतच 15 धावा देत 2 बळी टिपले, त्यात 25 डॉट बॉल्सचा समावेश होता. ईडनची खेळपट्टी वेगवान असून सिराजला अनुभवी शमीसमवेत येथे गोलंदाजी करणे निश्चितच आवडेल. याशिवाय जादा सीमरला व्यवस्थापन स्थान देते का, हे पाहणेही मनोरंजक ठरेल. उमरान मलिकने मधल्या षटकात चांगली गोलंदाजी केली. पण शनाकाने नंतर त्याला भरपूर चोप दिला. त्याची शिकण्याची प्रक्रिया सुरू असून तो हळूहळू प्रगती करण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार शनाका व निसांका वगळता इतरांकडून निराशाच झाली होती. 7 बाद 179 अशा स्थितीनंतर अष्टपैलू शनाकाने शानदार नाबाद शतक झळकावत आशा निर्माण केल्या होत्या. हाच फॉर्म तो पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण भारताला टक्कर देण्यासाठी त्यांच्याकडून सांघिक कामगिरी होण्याची गरज आहे. निसांकाही उत्तम फॉर्ममध्ये असून या सामन्यात लंका संघ फलंदाजीत सुधारित कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. क्षेत्ररक्षण व गोलंदाजी यातही त्यांना सुधारणा करावी लागेल. पहिल्या सामन्यातील पॉवरप्लेमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी बऱयाच धावा दिल्या. डावखुरा स्पिनर दिलशान मधुशन्काने मागील सामन्यात वनडे पदार्पण केले. पण क्षेत्ररक्षण करताना त्याचा खांदा दुखावला होता. क्ष-किरण तपासणीच्या अहवालानंतर त्याच्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी सांगितले.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), शुबमन गिल, कोहली, सूर्यकुमार, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान, सुंदर, चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, शमी, सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.
लंका ः दसुन शनाक (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), निसांका, अविष्का फर्नांडो, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, अशेन बंदारा, महीश तीक्षणा, करुणारत्ने, मधुशन्का, रजिता, नुवानिंदू फर्नांडो, वेलालगे, प्रमोद मधुशान, लाहिरु कुमारा.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.