क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती स्पोर्टस् क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात माळमारूती संघाने लॉगर संघाचा 9 गडय़ांनी, एक्स्ट्रीम स्पोर्टस् संघाने ग्लॅडियटर्स संघाचा सरस धावसरारसीच्या आधारे विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वैष्णव संघमित्र (माळमारूती) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लॉगर संघाने 8.2 षटकांत सर्व बाद 108 धावा केल्या. त्यात निलेश पाटीलने 50, विजय धनुरने 15 धावा केल्या. माळमारूती संघातर्फे मदन बेळगावकरने 17 धावांत 4, वैष्णव संघमित्रने 29 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना माळमारूती संघाने 13 षटकात 1 बाद 109 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात वैष्णव संघमित्रने 2 षटकार, 6 चौकारांसह 58, भावीन पुजारीने 26, सागर देसाईने 22 धावा केल्या. लॉगरतर्फे झेवियर गोम्सने 1 गडी बाद केला. दुसऱया सामन्यात एक्स्ट्रीम संघाने 20 षटकांत 8 बाद 133 धावा केल्या. गजानन पाटीलने 32, समीर येळूरकरने 18, नवीन हंचीनमनीने 17 धावा केल्या. ग्लॅडिएटर्सतर्फे केतज कोल्हापुरेने 14 धावांत 3, अलिम माडीवाले व सिद्देश साळवी यांनी प्रत्येकी 24 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्लॅडिएटर्सने 5 षटकांत बिनबाद 31 धावा जमविल्या असताना पावसाने हजेरी लावली. केएससीएच्या नियमानुसार 5 षटकांतील दोन्ही संघांच्या धावांच्या आधारावर निकाल देण्यात आला. त्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्सला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. अंतिम सामना सोमवारी एक्स्ट्रीम वि. माळमारूती यांच्यात सकाळी 10 वाजता खेळविण्यात येणार आहे.