महांतेशनगर गाळय़ांना थंडा प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी मंगळवारी माळमारूती येथे लिलाव प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी असलेल्या तिन्ही गाळय़ांना चांगली बोली लागली. मात्र महांतेशनगर येथील दोन गाळय़ांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत कोणीच सहभाग घेतला नाही.
माळमारूती येथील तीन दुकानांसाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. याकरिता महापालिकेने 5500 रूपये प्रति महिना एका गाळय़ासाठी भाडे निश्चित केले होते. या गाळय़ांना मागणी असल्याने लिलाव प्रक्रियेत 7 जणांनी सहभाग घेतला होता. लिलाव प्रकरणी वेळी एका गाळय़ासाठी 7100 रूपये पर्यंत बोली लागली, दुसऱया गाळय़ासाठी 6100 आणि तिसऱया गाळय़ासाठी 5800 रूपये बोली लावण्यात आली. सर्वाधिक बोली असल्याने तिन्ही गाळे भाडेतत्वावर देण्यात आले. तसेच महांतेशनगर येथील दोन गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. पण या लिलाव प्रक्रियेत कोणीच भाग घेतला नाही. यामुळे दोन्ही गाळय़ांचा लिलाव रद्द करण्यात आला.
महापालिकेचे व्यापारी संकुलातील गाळे घेण्यासाठी व्यवसायिकांची चढाओढ असते. मात्र महापालिकेने आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभत आहे. 85 गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे. पण काही ठरावीक ठिकाणी असलेल्या गाळय़ांना अधिक मागणी आहे. तसेच व्यवसायिकांना जीएसटी भरण्याची सूचना महापालिकेने केली आहे. त्यामुळे याचा फटका व्यवसायिकांना बसत आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या भाडय़ाच्या रक्कमेवर 18 टक्के जीएसटी भरावी लागत आहे. त्यामुळे भाडय़ाची रक्कम देखील वाढत आहे. सर्वसाधारण 1 हजार रूपये भाडे असल्यास 180 रूपये जीएसटीची रक्कम भरावी लागत आहे. लिलावामध्ये जीतकी बोली लागेल त्यावर 18 टक्के जीएसटी कर भरावा लागतो. त्यामुळे याचा फटका व्यवसायिकांना बसत आहे. परिणामी व्यवसायिक लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.