प्रतिनिधी/ बेळगाव
माळी गल्ली येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने रविवारी गल्लीतील गरीब नागरिकांना अन्नधान्य व साहित्याचे वितरण करण्यात आले. शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, जितेंद्र रजपूत यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना किरण गावडे म्हणाले, माळी गल्ली येथील युवकांनी ज्या ज्या वेळी आपत्ती आली, त्या त्या वेळी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. इतर युवकांनीही अशाच प्रकारे आपल्या आसपासच्या गरजू नागरिकांना साहित्याचे वितरण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विजय मोरे म्हणाले, या कोरोनाने आपल्या समाजाला आपुलकी शिकविली आहे. जात भेद न मानता बेळगावमधील युवकांनी समाजसेवा सुरूच ठेवली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवून या कोरोनाविरोधात लढा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
बेळगावमधील व्यापारी चंदू पुरोहित, हिराचंद मेहता, राजू कडोलकर, गणेश गुंडप, विशाल ताशिलदार, चंदू जाधव, मदन लोहार, जितेंद्र रजपूत, कन्हैया चौधरी, श्रीकांत धुडूम, भाऊराव चौगुले यांनी मंडळाला साहित्य दिले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, मिलींद बामणेकर, वृषभ कल्याणकर, प्रतिक बडमंजी, भूषण हेब्बाळकर, भाऊराव चौगुले, सचिन कदम, रवी जाधव यासह इतर उपस्थित होते.