ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :
मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पिंपरी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सकाळी 11 वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मागील तीन महिन्यांपासून गजानन बाबर हे लिव्हर कॅन्सरच्या आजाराने त्रस्त होते. तसेच दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गजानन बाबर हे मुळचे सातारा जिल्ह्यातील किकली गावचे रहिवाशी होते. 1990 च्या दशकात त्यांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले. एक कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा त्यांनी सुरू केली होती. 3 वेळा नगरसेवक राहिलेले बाबर 2009 ते 2014 या दरम्यान मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून आले होते. 2014 साली शिवसेनेने बाबर यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना तिकीट दिले. तेव्हापासून ते पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. मात्र, ते तिथे फार काळ रमले नाहीत. 2017 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा पिंपरी शहरात सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, दोघे भाऊ मधुकर व प्रकाश बाबर आहेत.