18 जणांना मिळवून दिला रोजगार, तर 14 जणांना मिळवून दिलं अर्थसहाय्य
संग्राम काटकर /कोल्हापूर
मिरजकर तिकटी येथे साजरी केल्या जाणाऱया शिवजयंतीच्यानिमित्ताने माणसाला माणूस जोडण्याचं काम मावळा कोल्हापूर हे गेल्या 14 वर्षापासून करत आहे. शिवाय एक शिवकार्य म्हणून गणेशवाडीतील शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप, कोविड सेंटरची उभारणी, शहाजी कॉलेजातील वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक हॉस्पिटलचे नूतनीकरण, रक्तदान शिबिर, पूरग्रस्त-सफाई कामगारांना जेवण, कोरोना प्रतिबंधक लसीकरण असे उपक्रम राबवून जनमाणसाना आपलंस केले आहे. शिवाय तरुणाईला स्वतच्या पाया उभं करण्याचेही काम एक कर्तव्य म्हणून हाती घेऊन तब्बल 18 तरुणांना उद्योगिक वसाहतीत नोकऱया मिळवून दिल्या आहेत. नोकरी मिळालेले हे तरुण नोकरीत आजही टिकून आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या तारखेनुसार मावळा कोल्हापूर हे अध्यक्ष उमेश पोवार यांच्या नेतृत्वाखाली धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करत असते. तसेच जयंतीला लोकाभिमुख करण्यासाठी समाजकार्याची किनारही दिली आहे. त्यानुसार विविध उपक्रम राबवून त्यात जनमाणसांना सामावून घेतले जाते. मावळा कोल्हापूरने केलेल्या अनेक उपक्रमांपैकी पोंबरे धरण (ता. पन्हाळा) परिसरातील तांबटीच्या जंगलात वर्षानुवर्षे राहणाऱया वानरमारे कुटुंबीयांना मदतीचा दिलेला हात खरोखरच कौतुकास्पद ठरला आहे. शिवाय वानरमारे कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तू देऊन त्यांचे राहणीमानच बदलून टाकण्याच्या मावळाने प्रयत्न केला आहे. मावळाने सामाजिक उपक्रम राबतानाच तरुणांना नोकऱया मिळवून देण्याची जबाबदारीही मोठय़ा भावाप्रमाणे स्वीकारली. नोकरी दिली जाणारा तरुण हा गरजूच असेल असे कार्यकर्त्यांनी निश्चित केले. त्यानुसार औद्योगिक वसाहतीत जाऊन कोणत्या उद्योगांमध्ये तरुणांची गरज आहे, याचा शोध घेतला. तसेच गरजू कुटुंबांशी चर्चा करुन त्यांच्या मुलांना नोकरी मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतोय, असे पटवून सांगितले. इतकेच नव्हे तरुणांना नोकरीसाठी राजी करुन औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडे नेले. त्यांना तरुणांचे शिक्षण व कामाची गरज सांगून नोकरी देण्याची विनंती केली. उद्योजकांनीही विनंतीचा मान राखत तरुणांना उद्योगात नोकऱया दिल्या. मावळाच्या या धडपडीमुळे आजवर 18 तरुणांना रोजगार मिळाला आहे. त्यांनीही नोकऱयांमध्ये टिकून मावळा कोल्हापूरची धडपड सार्थकी लावली आहे.
14 जणांना मिळाले लाखोंचे कर्ज…
मावळा कोल्हापूरने व्यवसाय करु इच्छिणाऱयांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी खटपट घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व बँक अधिकाऱयांशी चर्चा करुन 14 तरुणांना अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. मलाही 40 लाखांचे अर्थसहाय्य मिळवून दिले. त्यामुळेच मी कास्टींगशी संबंधित माईल्ड स्टोन इंडस्ट्रीज उभा करु शकलो. सध्या माझ्याकडे 40 कामगार काम करत आहे.
मावळामुळे सुपरवायझर झालो…
उचगाव येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये मी सुपरवाईझर सध्या कार्यरत आहे. पूर्वी मी खासगी ठिकाणी नोकरी करत होतो. मात्र तेथे लॉकडाऊनमध्ये काम कमी आल्याने पगारही कमी मिळू लागला. त्यामुळे नाईलाजास्तव नोकरी सोडावी लागली. मधल्या काळात मात्र मावळा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी मला घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये नेऊन तेथील पदाधिकाऱयांना नोकरी देण्याची विनंती केली. सुदैवाने माझ्याकडील अनुभवाची पारख करुन मला सुपरवायझर म्हणून रुजु करुन घेतले.
अनिकेत घाटगे (रा. कसबा बावडा, मुळगाव-सेनापती कापशी)