प्रतिनिधी /वास्को
वास्को, मुरगाव व दाबोळी परिसरात गरबा दांडीयाचा उत्साह वाढू लागलेला आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे या आनंदाला मुकावे लागले होते. यंदा कोरोनापासून थोडासा दिलासा वाटू लागल्याने उत्साही युवक युवती गरबा दांडीयामध्ये गर्दी करू लागलेले आहेत. हरवलेला आनंद पुन्हा शोधू लागलेले आहेत. वाहतूक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी चाफेरान मेर्सिस वाडे वास्को येथील श्री साई चाफेरान मंडळाच्या नवरात्री उत्सवाला भेट दिली व आपल्या कार्यकर्त्यांसह गरबा दांडीयाचाही आस्वाद घेतला.
मागच्या वर्षी नवरात्रोत्सावात केवळ औपचारीकता पार पाडावी लागली होती. कोरोनाच्या सावटामुळे उत्सवातील उत्साह हरवला होता. गरबा दांडीयाला फाटा देण्यात आला होता. त्यामुळे मागच्या वर्षी नवरात्रोत्सव सुना सुना वाटला होता. यंदा कोरोनाचे सावट पूर्णपणे ओसरलेले नसले तरी उत्सव प्रेमींमध्ये उत्साह आहे. वास्को, मुरगाव व दाबोळीच्या काही भागात दांडीया गरबा खेळला जात आहे. सहभागी होणाऱयांची संख्या कमी असली तरी उत्साह दिसून येत आहे. दाबोळी मतदारसंघाचा भाग असलेल्या मेर्सिस वाडे भागात श्री साई चाफेरान मंडळाच्या नवरात्री उत्सवाला मंत्री माविन गुदिन्हो यांनीही भेट दिली. ते गरबा नृत्यातही सहभागी झाले. त्यांच्याबरोबरच त्यांचे सहकारी व मुरगावचे माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर, नगरसेवक लियो रॉड्रिग्ज, बोगमाळोचे उपसरपंच संकल्प महाले, कार्यकर्ते ब्रह्मा पवार, साईश मेस्ता यांच्यासह ऍड. अमेय सैल, सर्वेश महाले, धिरज तळेकर, सुनील मांद्रेकर, प्रितेश मडकईकर, रफिक शेख, यश गांवकर, पांडुरंग भगत, आनंद कांबळे, उज्वला कांबळे, बुद्धेश पालयेकर, अतिश तुळसकर, सुकूर कार्व्हाल्हो, दिशांत परब आदी कार्यकर्त्यांची पावलेही या गरबा नृत्यात थिरकली. नेत्यांच्या सहभागामुळे वाडय़ावरील मंडळींचाही उत्साह दुणावला. त्यानंतर मंत्री गुदिन्हो यांनी तेथील साई मंदिराला भेट देऊन देव दर्शन घेतले. यावेळी नगरसेवक लियो रॉड्रिग्ज व क्रितेश गावकर यांच्या हस्ते मंत्री माविन गुदिन्हो यांचा भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. मंत्री गुदिन्हो यांनी आपल्या मतदारसंघात मेहनती कार्यकर्ते असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगून आभार मानले.