दोघांनीही काढली एकमेकांची उणीधुणी
प्रतिनिधी / पणजी
टॅक्सी मीटर प्रकरणावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्ये उफाळून आलेला वाद सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो म्हणतात की टॅक्सी मालकांना मोफत मीटर बसवून द्या, तर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणतात की अगोदर टॅक्सीमालकांनी स्वखर्चाने मीटर बसवावे, नंतर सबसिडी दिली जाईल. यावरुन दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांची उणीधुणी काढून एकमेकावर आरोप प्रत्त्यारोपही केले आहेत. गुदिन्हो यांनी बुधवारी मायकल लोबो यांच्या कचरा व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना लोबो यांनी गुदिन्हो यांच्यावर जहरी टीका केली.
पर्वरी येथे काल गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोबो यांनी जोरदार टीका केली. कोरोना महामारी काळात टॅक्सी व्यवसाय ठप्प झाल्याने राज्यातील टॅक्सी मालकांची परिस्थिती बिकट बनली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टॅक्सीमालक मीटर बसवायला तयार आहेत. सरकारने मोफत मीटर बसवून द्यावे. या विषयावर आपली मुख्यमंत्र्यांशी बोलणीही झाली, असे लोबो म्हणाले.
गुदिन्हो गोमंतकीयांसाठी काम का करु शकत नाही?
जानेवारी ते 31 मार्चपर्यंत वाहतूक नोंदणी फी कमी करावी या मागणीसाठी वाहतूकमंत्र्यांनी झटपट काम करून फी कमी करून घेतली होती. ही मागणी केवळ दहा वाहन विक्रेत्यांसाठी होती. त्यांच्यासाठी वाहतूकमंत्री काम करू शकतात तर गोमंतकीयांसाठी काम का करू शकत नाही, असा प्रश्न लोबो यांनी उपस्थित केला आहे.
अधिकाधिक टॅक्सीमालक मध्यमवर्गीय गोमंतकीय
अधिकाधिक टॅक्सीमालक हे गोव्याचे असून ते मध्यवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांच्यासाठी काम करणे महत्वाचे आहे असेही मायकल लोबो म्हणाले.
एकटय़ाच्या चुकीच्या वागण्याचा पक्षाला फटका बसतो
पक्षातील एखादा मंत्री जरी जनतेच्या विरोधात वागू लागला तर त्याचा फटका पक्षाला बसत असतो, याची जाणीव गुदिन्हो यांनी ठेवावी. 2015-2016 सालात हाच प्रकार घडला आणि 2017 च्या विधानभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच भाजपला त्याची फळे भोगावी लागली. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी टॅक्सी मालकांना मोफत मीटर बसविण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे, असे लोबो म्हणाले.
दुसऱया पक्षातून आलेल्यांनी आम्हाला सांगू नये
दुसऱया पक्षातून आलेल्यांनी आम्हाला आमच्या कामाबात सांगण्याची गरज नाही. गुदिन्हो वयाने तसेच अन्य सगळ्याच बाजूने मोठे असतील, पण मंत्री म्हणून काम करताना गोमंतकीय जनतेला अगोदर प्राधान्य द्यायला हवे, याचे भान ठेवण्याचा सल्ला लोबो यांनी गुदिन्हो यांना दिला आहे.
सडा-वास्कोतील कचऱयाचे ढिगारे आपण हटवले
गुदिन्हो आज मुरगाव तालुक्याचे आपण नेते असल्याचा दावा करीत आहेत. कदाचित असतीलही ते, मात्र नेते असल्यास जनतेसाठी तसे योगदान देणे फार महत्वाचे आहे. त्या भागातील जागा स्वच्छ ठेवण्यासाठी अगोदर प्रयत्न करावेत. वास्को सडा येथील कचऱयाचे ढिगारे साफ करण्याचे काम आपण केले आहे. आज वास्कोत कचरा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोक विरोध करतात त्याचे काय, असा प्रश्न मायकल लोबो यांनी उपस्थित केला आहे.