कला-संस्कृती खात्याचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार 14 ज्येष्ठांचा होणार सन्मान
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचे 2021-22 सालचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाले असून कला व साहित्य क्षेत्रात मौलीक कार्य केलेल्या 14 ज्येष्ठांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 2021-22 सालची उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था म्हणून ‘महाशाला कला संगम, माशेल’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे. कलाक्षेत्रातील नाटक, तियात्र, संगीत, साहित्य, चित्रकला, छायाचित्रण, लोकसंगीत, लोककला, हस्तकला भजन, कीर्तन, चित्रपट आदी विविध प्रकारांत विशेष व उल्लेखनीय कार्य करीत लौकीक संपादन करणाऱया ज्येष्ठांना तसेच एका संस्थेला दरवर्षी या खात्यामार्फत राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या वर्षी (2021-22) राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त मान्यवर पुढीलप्रमाणेः रमेशचंद्र कोलवाळकर, बार्देश (साहित्य), मिलिंद मनोहर म्हाडगुत, फोंडा (साहित्य), साजु उर्फ मनोहर नाईक, फोंडा (भारतीय संगीत), बाल्ताझार फर्नांडिस, तिसवाडी (पाश्चात्य संगीत), लेस मिनेझिस, तिसवाडी (नाटक), गुरुदास गाड, फोंडा (नाटक), बियात्रिस जोसेफिन उर्फ बेटी नाझ, सालसेत (तियात्र), जुझे लुईस दियोगो फर्नांडिस, तिसवाडी (तियात्र), विलीयम फर्नांडिस, केपे (तियात्र), फातिमा डिसोझा, सालसेत (तियात्र), ह.भ.प. गजाननबुवा नाईक उर्फ के.के. नाईक, फोंडा (कीर्तन), परशुराम काणकोणकर, तिसवाडी (भजन), झिलू लक्ष्मण गांवकर, डिचोली (लोककला), संजय हरमलकर, बार्देश (चित्रकला)
वैयक्तिक पुरस्काराच्या स्वरुपात रोख एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र, नटराजाची प्रतिमा, श्रीफळ व शाल प्रदान केली जाते. तर उत्कृष्ट सांस्कृतिक संस्थेला रोख रु. तीन लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान केले जाते. पुरस्कारांचे वितरण खास सोहळ्यात होणार असून वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.