वार्ताहर /माशेल
माशेल येथील जुन्या बसस्थानक मार्गाच्या उतरणीवर पार्क करून ठेवलेली कारगाडी अचानक रिव्हर्समध्ये खाली आल्याने रस्त्यावर पार्क केलेल्या चार दुचाकांचे नुकसान झाले. सदर घटना काल शुक्रवारी सकाळी 8 वा. सुमारास घडली. सुदैवाने प्राणहानी टळली तरी सर्व वाहनांची जबर नुकसानी झाली.
प्राप्त माहितीनुसार वाडकर नामक व्य़क्तीने आपली व्हेगनआर जीए 05 बी 8782 जुने बसस्थानकाच्या उतरणीवर दुकानाच्या समोरच्या रस्त्यावर पार्क केली होती. अचानक कारगाडी रिव्हर्समध्ये त्या उतरणीवरून खाली येताना चार दुचाकींना ठोकरल्यानंतर स्थिरावली. त्यात जीए 05 एम 3933 एक्टीवा, जीए 04 डी 8763 एक्सेस, जीए 05 एन 9865 एक्टीवा व जीए 03 एल 4286 पल्सर मोटरसायकल गाडय़ा सुमारे 50 मिटर अंतर फरफटत सलुनच्या दारात जाऊन स्थिरावल्या. सकाळच्या सत्रात वाहन व पादचाऱयाची वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक विनोद साळूंके यांनी घटनास्थळी पंचनामा केला.