बेळगाव / प्रतिनिधी
श्रावण महिना जवळ येऊ लागल्याने त्यापूर्वी मासळीचा आस्वाद घेण्यासाठी फिश मार्केटमध्ये खवय्यांची गर्दी होऊ लागली आहे. बांगडा, सुरमई व कोळंबीला सर्वाधिक मागणी आहे. मासळी जरी उपलब्ध असली तरी दर मात्र थोडे चढेच असल्याने किलोऐवजी अर्धाच किलो खरेदी करत आहेत.
बेळगाव शहरात कॅम्प व कसाई गल्ली अशा दोन ठिकाणी मासळी मार्केट आहे. दोन्ही ठिकाणी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी होत आहे. पावसाळा सुरू असला तरी मुबलक प्रमाणात मासे बेळगावमध्ये उपलब्ध आहेत. बांगडा, पापलेट, सुरमई, कोळंबी, समुद्री खेकडे असे विविध प्रकारचे मासे खरेदी करता येत आहेत. श्रावण महिन्यात अधिकतर नागरीक मांसाहार करत नसल्याने त्यापूर्वी मासे, मटण, चिकनचा आस्वाद घेत आहेत.
कारवार, गोवा-मालवण भागातील मासे बेळगावमध्ये दाखल
कारवार, गोवा व मालवण भागातील मासे बेळगावमध्ये दाखल होत आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खोल समुद्रातील मासेमारी कमी झाल्याने स्टोअरेजचे मासे बेळगावला अधिक प्रमाणात येत आहेत. परंतु अद्याप हवी तशी मार्केटमध्ये गर्दी नसल्याचे रफिक बेपारी यांनी सांगितले.
माशांचे दर (प्रतिकिलो)
- बांगडा- 200 ते 240 रू.
- सुरमई – 600 ते 700 रू
- पापलेट- 800 (पांढरा), 600 (काळा)
- कोळंबी- 300 ते 350 रू.