दैनंदिन बसपासला पसंती, परिवहनच्या महसूलात वाढ
बेळगाव /प्रतिनिधी
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे पाठ फिरविलेल्या प्रवाशांची आता मासिक बसपासची मागणी वाढली आहे. दररोज एकाच मार्गावरून प्रवास करणाऱया सर्वसामान्य प्रवाशांची आर्थिक बचत व्हावी, यासाठी परिवहन मंडळातर्फे सवलतीच्या दरात मासिक पास दिला जातो. मध्यवर्ती बसस्थानकातील बसपास विभागात बसपास मिळविण्यासाठी प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक व्यवसाय उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया कामगार नोकरदार वर्गांची संख्या वाढली आहे. दैनंदिन गोवा, कोल्हापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुबळी, अथणी, गोकाक, सौंदत्ती, अंकली, घटप्रभा, कागवाड, धारवाड, बैलहोंगल असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दैनंदिन बसपासबरोबर मासिक बसपासची मागणी वाढली आहे.
नोकरदार व कामगारवर्गाला प्रवास करणे सुलभ व्हावे, यासाठी सवलतीच्या दरात महिन्याभरासाठी बसपास उपलब्ध करून दिला जातो. सर्रास कामगार व नोकरदार या मासिक बसच्या माध्यमातून प्रवास करतात. यामुळे परिवहनला लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो. याबरोबर शहराअंतर्गत व ग्रामीण भागात प्रवास करणाऱयांसाठी दैनंदिन बसपास सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो. या बसपासला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. शिवाय बसस्थानकात असलेल्या आगाऊ बुकिंगला दिवाळीनिमित्त प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. शहरासाठी मर्यादित असलेल्या मासिक बसपासचा दर 700 रुपये तर मर्यादित ग्रामीण भागासाठी 1000 रुपये तर संपूर्ण ग्रामीण भागासाठी 1300 रुपयांत मासिक बसपास उपलब्ध करून दिला जात आहे.