प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मत्स्याहार करणाऱयांना राज्य सरकारकडून लवकरच खूशखबर मिळणार आहे. ग्राहकांना आता ऑनलाईनद्वारे मासे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे खवय्यांना मासे खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही, अशी माहिती मत्स्योद्योग आणि बंदरविकास मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली आहे.
यंदाच्या वर्षात 137.20 कोटी रुपये खर्चाच्या विविध योजना केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांपर्यंत राज्या सुमारे 4,115 कोटी रुपयांचा कृती आराखडा सादर करण्यात आला आहे. या विविध योजनांसाठी मोबाईल ऍप तयार करण्यात येत आहे. 21 नोव्हेंबर रोजी मत्स्यसंपदा योजना आणि कार्यशाळेला चालना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा विधानसौध येथे या योजनेचा शुभारंभ करतील, अशी माहिती कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली.
अंतर्गत मत्स्योद्योग क्षेत्रात कर्नाटकाचा देशात नववा क्रमांक लागतो. तर समुदी मत्स्योद्योगामध्ये चौथा क्रमांक लागतो. त्यात प्रथम स्थान पटकावण्याचे उद्दिष्ट सरकारने बाळगले आहे. 21 नोव्हेंबर रोजी होणाऱया कार्यशाळेत माशांच्या विविध खाद्यपदार्थांची ओळख करून दिली जाणार आहे. मंगळूर मत्स्योद्योग महाविद्यालयाचे रुपांतर विद्यापीठात करण्यात येईल. अंकोला, शिमोगा, उडुपी, म्हैसूर आदी ठिकाणी मत्स्योद्योग महाविद्यालये स्थापन करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
हेसरुघट्ट येथील मत्स्यपालन केंद्रामध्ये 1 कोटी रुपये खर्चातून मत्स्य क्वारंटाईन केंद स्थापन करण्यात आले आहे. येथे विदेशात आढळून येणारी रंगीबेरंगी आकर्षक माशांचे पालन करण्यात येईल. विदेशातून आयात होणारे मासे आठवडाभर विलगीकृत करून ते रोगमुक्त असल्याची खात्री झाल्यानंतर ते पालन करण्यासाठी देण्यात येत आहेत. यापूर्वी केवळ चेन्नई येथेच अशी व्यवस्था होती. आत्मनिर्भर योजनेंतर्गत 10 हजार युवकांना मत्स्योद्योग खात्यातर्फे राज्यातील विविध भागात रोजगार उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासही मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिले.