सध्या कोरोनाचं नवं रुप ओमिक्रॉनमुळं जगाची चिंता वाढली आहे. पुन्हा मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर यांचा बोलबाला सुरु झाला आहे. सर्वांनी नियम पाळणं हे प्रत्येकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. तथापि, काहीजण आजही बेदरकार आहेत. नियम पाळणं म्हणजे स्वतःच्या अधिकारांवर गदा येणं, अशा भ्रामक आणि धोकादायक समजुतीत ते वावरत आहेत. रशियात अशाच समजुतीपायी दोन लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
घटना अशी आहे की, रशियाची राजधानी मॉस्को येथे एका कार्यालयात एका कर्मचाऱयाला मास्क उपयोगात आणण्यासा सांगण्यात आलं. कारण कार्यालयाचा तसा नियम होता. कोरोनाचं संकट जोपर्यंत पूर्णतः निवारलं जात नाही, तोपर्यंत प्रत्येकानं मास्क लावायलाच हवा असा नियम या कार्यालयात आहे. तथापि, माक्स अनिवार्य केल्यानं या कर्मचाऱयाचा पारा चढला. त्यानं आपल्याच कार्यालयावर चक्क गोळीबार केला. या हल्ल्यात दोन कर्मचाऱयांना प्राण गमवावे लागले. मॉस्कोचे महापौर सर्जी साबॅनिन यांनीच ही माहिती दिली. या हल्ल्यात चारजण गंभीर जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये 10 वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. गोळीबार करणारा हा कर्मचारी मास्कोचाच नागरीक आहे. त्याचं नाव हेपुपुरस्सर गुप्त ठेवण्यात आलं आहे. ही घटना संतापाच्या भरात घडली की त्यामागं काही कारस्थान आहे, हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. चौकशीनंतरच गुन्हेगाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. या व्यक्तीकडून बंदूक जप्त करण्यात आली असून त्याला अटकही करण्यात आली आहे. तथापि, रशियात घडलेली ही घटना आपल्या सर्वांसाठी धडा देणारी आहे. विशिष्ट परिस्थितीत भावनांवर आवर घालणं आणि नियम कितीही जाचक वाटले तरी ते आपल्या आणि इतरांच्या हिताचे आहेत, हे समजून ते पाळणं किती महत्वाचं आहे, हे या घटनेवरुन आपल्या सर्वांनी समजून घेणं आवश्यक आहे.