प्रतिनिधी/ काणकोण
काणकोण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करण्याचा प्रसंग स्थानिक नागरिकांवर आलेला असून ऐन नाताळ सणात काणकोण नगरपालिकेच्या मास्तीमळ वॉर्डात भेडसावलेल्या पाण्याच्या टंचाईमुळे लोकांची खूपच गैरसोय झाली. माजी नगरसेवक किशोर शेट यांनी नेहमीप्रमाणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याचा टँकर आणून लोकांची सोय केली.
या तालुक्यात ऐन हंगामात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवायला लागली असून नाताळ सणाच्या वेळी जर ही परिस्थिती तर नववर्ष कसे साजरे करायचे या चिंतेत स्थानिक लोक पडले आहेत. दरम्यान, चापोली धरण ते नगर्से परिसर आणि कोकण रेल्वे कॉलनीपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू करण्यात आलेले असून त्यामुळे काही अंशी ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली.