प्रतिनिधी /बेळगाव
माहेश्वरी समाजातील गणगौर सण उत्साहाने साजरा करण्यात आला. राजस्थान व मध्यप्रदेश सीमाभागातील समाज चैत्रशुद्ध तृतीयेच्या मुहूर्तावर गणगौर हा सण साजरा करतात. यावेळी भगवान शंकर व माता पार्वती यांची इसरजी व गौर या रुपात पूजा करण्यात आली.
होलिका दहनाच्या दुसऱया दिवशी म्हणजेच चैत्रकृष्ण प्रतिपदेपासून चैत्रशुक्ल तृतीयेपर्यंत 18 दिवस हा सण चालतो. यावेळी गौरी म्हणजेच पार्वती माहेरी येते व चैत्रशुद्ध द्वितीयेला भगवान इसरजी त्यांना परत नेण्यासाठी येतात, त्याला सिंजारा असे म्हणतात. या तृतीयेला सुहासिनी व कुमारी कन्या, इसरजी व गौरी पूजन करून माहेर व सासरच्या सुख-समृद्धीसाठी तसेच इच्छीत वरासाठी प्रार्थना करतात. तृतीयेला सायंकाळी पाठवणी होते.
शहापूर परिसरात माहेश्वरी महिला मंडळाने हा सण साजरा केला. इसरजी आणि गौरी यांच्या मूर्ती घेऊन मिरवणूक काढण्यात आली व इच्छीत प्राप्तीसाठी प्रार्थना करण्यात आली.