ऑल-चायनीज अंतिम फेरीत झेनडाँगवर मात
चीनच्या द्वितीय मानांकित मा लाँगने अव्वलमानांकित फॅन झेनडाँगला पराभवाचा धक्का देत पुरुष टेबलटेनिस एकेरीचे सुवर्णपदक जिंकले. या यशश्रीमुळे त्याने 2016 रिओ ऑलिम्पिकमधील जेतेपद कायम राखल्याचे स्पष्ट झाले. मा लाँग आधुनिक युगातील महान पॅडलर मानला जातो. हे बिरुद त्याने येथे खऱया अर्थाने सार्थ करुन दाखवले.
टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियममध्ये रंगलेल्या ऑल चायनीज अंतिम फेरीत त्याने आपलाच राष्ट्रीय सहकारी फॅन झेनडाँगला 11-4, 10-12, 11-8, 11-9, 3-11, 11-7 अशा फरकाने मात दिली. मा लाँगने 4-2 अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला असला तरी उभयतात सातत्याने दीर्घ रॅलीज रंगल्या. मा लाँग केवळ अनुभवाच्या बळावरच येथे यश खेचून आणण्यात यशस्वी ठरला. या निकालामुळे फॅन झेनडँगला ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्यासाठी आणखी 3 वर्षे तरी प्रतीक्षा करावी लागेल, हे देखील निश्चित झाले.
ड्रगॉन या टोपण नावाने ओळखल्या गेलेल्या लाँगने अगदी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावला. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस कॅलेंडरमधील सर्व महत्त्वाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि तीन वेळचा विद्यमान विजेता ठरलेला लाँग गुडघ्याच्या दुखापतीमुळे अडचणीत होता. मात्र, येथे ऑलिम्पिकमध्ये उतरण्यापूर्वी त्याने पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त केली आणि फॉर्मही मिळवला होता.
टेबलटेनिसचा 1988 ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यानंतर आठही सुवर्णपदके स्वतंत्र पॅडलर्सनी मिळवली आहेत. यातील एकाही पॅडलरला आतापर्यंत ऑलिम्पिक सुवर्ण कायम राखता आले नव्हते. मात्र मा लाँगने ही परंपरा खंडित केली. जर्मनीच्या ओव्हेचॅरोव्हने पुन्हा एकदा कांस्य जिंकले. आश्वासक खेळ साकारणाऱया लीविरुद्ध जर्मन सुपरस्टार ओव्हेचॅरोव्हने 6 व्या गेममध्ये 4 मॅचपॉईंट वाचवत ही कामगिरी साध्य केली.
महिला एकेरीत चीनची चेन मेंग हिने ऑल चायनीज फायनलमध्ये सून यिंगशा हिला पराभूत केले आणि पदार्पणातच ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम साधला. जपानची मिमा इटो कांस्यपदकाची मानकरी ठरली. 10