प्रतिनिधी/ मडगाव
नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी अपेक्षेप्रमाणे काल शनिवारी दिल्लीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे केंद्रीय संघटण सचिव के. सी. वेणुगोपाल व गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी त्यांना पक्षात रितसर प्रवेश दिला. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना ही मिकी पाशेको यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. मिकी पाशेको हे आगामी निवडणुकीत बाणावली मतदारसंघातून निवडणुकीला उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मिकी पाशेको यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशातील जनता काँग्रेस पक्षाच्या राजवटीत चांगले जीवन जगली. मात्र, आत्ता भाजपच्या राजवटीत जनतेला कठू अनुभव घेत आहे. आज जनतेला काँग्रेस पक्षाचे महत्व पटू लागले आहे. अनेकांना काँग्रेस पक्षा शिवाय पर्याय नसल्याचे कळून चुकले आहे. आपल्या भावी पिढीसाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष सत्तेवर येणे ही काळाची गरज असल्याचे मिकी पाशेको म्हणाले.
आपण गेली 20 वर्षे गोव्यातील सक्रीय राजकारणात होतो. आपले योगदान संपूर्ण गोव्यासाठी होते. त्यामुळे आपण संपूर्ण गोव्यात काँग्रेस पक्षासाठी कार्यरत राहणार असून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणूक ही काँग्रेस विरूद्ध भाजप या दोनच पक्षात होणार आहे. पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिकी पाशेको हे या पूर्वी नुवे व बाणावली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. एकदा ते युगोडेपा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. त्यांनी भाजप व गोवा सूराज पार्टीत ही प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी स्वताची गोवा विकास पार्टी स्थापन केली होती. आणि आत्ता काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.