फायजर-ऍस्ट्राझेनेकाच्या चाचणीत मिळाले चांगले संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकार कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱया डोससाठी मिक्स अँड मॅचवर विचार करत आहे. वैज्ञानिक पद्धतीने हे शक्य असून भारतात अत्यंत उपयुक्त ठरू शकते. भारत आणि विदेशात यासंबंधी सुरु असलेल्या संशोधनावर नजर ठेवली जात असल्याचे एका आरोग्यतज्ञाने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर फायजर-ऑक्सफोर्ड लसींचा मिक्स अँड मॅच तयार करण्यावर काम केले जात असताना केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ञाने ही सूचना केली आहे. यासंबंधीचे अध्ययन भारतात काही आठवडय़ांमध्ये सुरू होऊ शकते आणि यामुळे लसीसंबंधी देशाच्या मोठय़ा गरजेची पूर्तता होऊ शकेल. वर्षाच्या अखेरपर्यंत किमान आठ लसी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सरकारने ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान 216 कोटी डोस उपलब्ध करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेत किमान 8 लस उत्पादक कंपन्या सामील आहेत. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुतनिक-व्ही, भारत बायोटेकची इंट्रानेसल व्हॅक्सिन, बायो ईची सबयुनिट लस, जायडस कॅडिलाची डीएनए लस, नोवावॅक्स लस आणि जेनोवाची एमआरएनए लस उपलब्ध होणार आहे.भारताने एप्रिल महिन्यात फायजर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्नाच्या लसीला मंजुरी दिली आहे. हैदराबाद येथील बायो ई कंपनीने भारतात अमेरिकेतील लस तयार करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनसोबत भागीदारी केली आहे.
विविध लसींचे डोस मिक्स केल्याने कोविड-19 विरोधात अधिक सुरक्षा मिळत असल्याचे काही अध्ययनात आढळून आले आहे. ऑक्सफोर्ड-ऍस्ट्राजेनेका आणि फायजर-बायोएनटेक, दोन्हींचे डोस घेणे सुरक्षित असून उत्तम इम्युन रिस्पॉन्स तयार होत असल्याचे समजते.