हवाई दलाकडून ‘कोर्ट ऑफ एन्क्वायरी’चे आदेश
बाडमेर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील बाडमेर येथे बुधवारी हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले. लढाऊ विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केल्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता भुरतिया गावात ते दुर्घटनाग्रस्त झाले. टेक-ऑफ केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान एका झोपडीवर कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने स्वतःला वाचविण्यासाठी पॅराशूटचा आधार घेतल्याने तो बचावला आहे. विमान दुर्घटनेबाबत हवाई दलाने कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनाग्रस्त मिग-21 लढाऊ विमानाचा पायलट अपघातस्थळापासून एक किलोमीटर दूरवर सापडला. स्थानिक लोकांनी त्याला मदत पुरविली. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळ सील केले असून एअरफोर्सचे पथकही घटनास्थळी घटनास्थळी दाखल झाले.
देशात गेल्या पाच वर्षात 483 हून अधिक मिग-21 विमाने अपघातांना बळी पडली आहेत. या अपघातात 170 हून अधिक वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी 17 मार्च रोजी एका अपघातात मिग-21 बायसन हे लढाऊ विमान उड्डाणादरम्यान कोसळले होते. तत्पूर्वी जानेवारीमध्येही मिग-21 राजस्थानच्या सुरतगडमध्ये कोसळले होते.