ऑनलाईन टीम / मिझोराम :
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉक डाऊन चा पर्याय अमलात आणला आहे. भारतात देखील दोन महिन्यांनी सोमवारपासून काही प्रमाणात देश अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, देशातील मिझोराम राज्य हे याला अपवाद ठरलेले असून या राज्याने आणखी दोन आठवड्यांसाठी लॉक डाऊन वाढवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिझोराम राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना मिझोराम सरकार म्हणाले की, मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली यामध्ये संपूर्ण लॉक डाऊन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सध्याच्या स्थितीत मिझोराममध्ये कोरोनाबाधितांची संख्या 42 आहे. त्यातील एका रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संख्येत अजून भर पडू नये, यासाठी मिझोराम सरकारने अजून दोन आठवडे लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.