मिटकरी यांनी माफी मागावी अन्यथा सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल
सावंतवाडी/ प्रतिनिधी:-
हिंदू वैदिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या विवाह संस्काराची खिल्ली उडवून ‘कन्यादान’ या विधीबद्दल समाजात गैरसमजत पसरवत धार्मिक तेढ निर्माण करून ब्राह्मण आणि पौरोहित्य यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या अमोल मिटकरी यांचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी शाखेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. मिटकरी यांनी केलेला प्रकार म्हणजे हिंदूधर्माच्या चालीरीती कलंकीत करण्याचा प्रकार आहे. त्यांनी या प्रकाराबद्दल प्रसार माध्यमातून त्वरित माफी मागावी अन्यथा सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल अशा आशयाचे पत्र येथील उपविभागीय अधिकारी यांना पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर, तालुका कार्यवाह अंजली नातू, श्री देव परशुराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळ पुराणिक, पंचद्रवीड ब्राह्मण सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रविंद्र ओगले, शिवानंद भिडे, गुरूप्रकाश सप्ते, शिवानंद भिडे, प्रदीप जोशी, नेत्रा मुळ्ये, गुरुदास देवस्थळी, विद्याधर पाटणकर, चंद्रकांत घाटे, केदार म्हसकर तसेच ब्राह्मण समाजातील सर्व सदस्य उपस्थित होते.
दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी इस्लामपूर, सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिर सभेत विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रभरातून करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही निषेधाचे पडसाद उमटले.