वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने आपले अग्रस्थान गमविले आहे. मिताली राज आता या ताज्या मानांकन यादीत तिसऱया स्थानवर फेकली गेली आहे. वनडे गोलंदाजांच्या मानांकनात भारताच्या झुलन गोस्वामीने दुसरे स्थान पटकाविले आहे.
38 वर्षीय मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 29 धावांच्या सरासरीने केवळ 87 धावा जमविल्याने तिला आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनातील आपले अग्रस्थान राखता आले नाही. दक्षिण आफ्रिकेची लिझेली ली 761 मानांकन गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाची ऍलिसा हिली 750 मानांकन गुणांसह दुसऱया, मिताली राज 738 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. भारताच्या स्मृती मानधनाने 710 गुणांसह या यादीत सहावे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या हिलीने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 112 धावा जमवित दुसरे स्थान पटकाविले.
वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या 38 वर्षीय झुलन गोस्वामीने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत झुलनने एकूण 4 बळी मिळविले होते. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात गोस्वामीने 37 धावांत 3 गडी बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत झुलन गोस्वामीने 251 गुणांसह 10 वे स्थान मिळविले आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची जोनासेन 760 मानांकन गुणांसह पहिल्या तर गोस्वामी 727 मानांकन गुणांसह दुसऱया स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाची स्कूट 717 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेच्या केपने अग्रस्थान मिळविले असून दिप्ती शर्मा पाचव्या स्थानावर आहे.