वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकनात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने सातवे तर स्मृती मानधनाने नववे स्थान मिळविले आहे.
या ताज्या फलंदाजांच्या मानांकन यादीत मिताली राजचे स्थान एका अंकाने घसरले. यापूर्वी ती सहाव्या स्थानावर होती. न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. कर्णधार मिताली राजने सात सामन्यात 26 धावांच्या सरासरीने 182 धावा जमविल्या. तिने फलंदाजांच्या मानांकन यादीत 686 रेटींग गुणांसह सातवे स्थान मिळविले. स्मृती मानधनाने या स्पर्धेत सात सामन्यांतून 327 धावा जमवित फलंदाजांच्या मानांकन यादीत 669 गुणांसह नववे स्थान मिळविले आहे. उपकर्णधार हरमनप्रित कौरचे स्थान एका अंकानी वधारले असून तिने 14 वे स्थान मिळविले आहे. हरमनप्रित कौरने सात सामन्यांतून 318 धावा जमविल्या होत्या.
वनडे महिला फलंदाजांच्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज आणि यष्टीरक्षक ऍलीसा हिलीने अग्रस्थान पटकाविले. हिलीने इंग्लंडविरूद्धच्या अंतिम सामन्यात 170 धावांची दणकेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाला अजिंक्यपद मिळवून दिले. या स्पर्धेमध्ये 32 वर्षीय हिलीने नऊ सामन्यांत दोन शतके आणि दोन अर्ध शतकांसह 509 धावा झळकविल्या. या ताज्या यादीमध्ये पहिल्या सहा खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांचा समावेश आहे. बेथ मुनी, लॅनिंग, हेन्स आणि हिली यांनी पहिल्या सहा फलंदाजांमध्ये स्थान मिळविले आहे. इंग्लंडची अष्टपैलू स्किव्हरने दुसरे स्थान पटकाविले आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत इंग्लंडची फिरकी गोलंदाज इक्लेस्टोनने आपले आघाडीचे स्थान कायम राखले असून दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल दुसऱया स्थानावर आहे. भारताच्या झुलन गोस्वामीने पाचवे तर दिप्ती शर्माने सातवे स्थान मिळविले आहे.