ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार करणे आणि गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती ची पत्नी योगिता बाली यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप सिनेसृष्टत काम करणाऱ्या एक अभिनेत्री मॉडेलने केले आहेत.
38 वर्षांच्या पीडित अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाअक्षय आणि मी 2015 पासून रिलेशशिपमध्ये होतो. महाअक्षय हा अंधेरीतील ओशिवरा यमुनानगरच्या लष्करिया इमारतीमध्ये राहतो. 2015 मध्ये त्याने मला घरी बोलावले होते. तिथे त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि माझ्यावर अत्याचार केले. शुद्धीवर आल्यावर हा प्रकार लक्षात येताच, त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून सलग तीन वर्षे अत्याचार केले. त्यातून मी गरोदर राहिल्याचे समजताच गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. तसेच त्याच्या आईने योगिता बाली ने धमकी देखील दिली.
तीन वर्षे रिलेशशिपमध्ये राहूनही त्याने लग्न केले नाही लग्नाबद्दल विचारल्यास टाळत होता. त्यामुळे दिल्लीतील स्थानिक न्यायालयात महाअक्षय आणि त्याच्या आई विरोधात याचिका दाखल करून गुन्हा दाखल करण्याची विनंती मी केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या दोघांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, हा गुन्हा मुंबईत घडला असण्याने मुंबई पोलिसांकडे तपास सोपविण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर संबंधित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. महाअक्षय आणि योगिता बाली या दोघांची चौकशी करून लवकरच जबाब नोंदविण्यात येणार आहे.