आज पर्वरी येथे अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / पणजी
गोव्याचे माजी माहिती संचालक मिनिनो पिरीस (वय 68 वर्षे) यांचे बुधवारी पर्वरी येथे निधन झाले. आज गुरुवारी सकाळी 11 वा. पर्वरी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.
मुळचे काणकोण येथील असलेले पिरीस हे पत्रकारीता क्षेत्रातून पुढे आले. समाजशास्त्र विभागात मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी ‘उजवाड’ या रोमी कोकणी वृत्तपत्रातून पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर त्यांनी गोवा विद्यापीठातून एलएलबीची पदवी संपादन केली. ‘उजवाड’ मधून ते बाहेर पडले आणि त्यांनी पणजी आकाशवाणीवरून वृत्त निवेदनाचे काम केले. त्यानंतर त्यांनी गोवा सरकारच्या वाहतूक खात्यातून सेवा बजावली. त्यानंतर गोवा सरकारच्या माहिती खात्यात माहिती अधिकारी म्हणूनही काम केले. तेथून त्यांनी भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालयाच्या पणजी विभागातून वरिष्ठ अधिकारी म्हणूनही कामगिरी बजावली. 1980 मध्ये गोवा सरकारच्या माहिती खात्यात रुजू झाले. पुढे उपसंचालकपदी नियुक्त झाले. माहिती खात्यात हंगामी संचालक म्हणून त्यांनी काम केल्यानंतर 2003 मध्ये 1 वर्षासाठी राज्यभाषा संचालक म्हणून सेवा बजावली. 2005 ते 2012 या दरम्यान ते माहिती संचालक म्हणून काम करीत होते. भाटपाल काणकोणचे पिरीस यांनी पर्वरी येथे आपल्या बंगल्याचे नाव श्रीस्थळ असेच ठेवले आहे. गेले काही दिवस ते कोरोनामुळे आजारी होते. त्यांचा आजार बळावला आणि बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.