फेरारीच्या ड्रायव्हर्सना दुसरे व तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स
मियामी येथे पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मियामी ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेड बुलचा वर्ल्ड चॅम्पियन मॅक्स व्हर्स्टापेनने फेरारीच्या चार्लस लेक्लर्कला मागे टाकत जेतेपद पटकावले. या वर्षातील त्याचे हे तिसरे व कारकिर्दीतील 23 वे जेतेपद आहे. फेरारीच्याच कार्लोस सेन्झने या शर्यतीत तिसरे स्थान मिळविले.
24 वर्षीय व्हर्स्टापेनने पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि अखेरपर्यंत आघाडी कायम राखत लेक्लर्कपेक्षा 3.78 सेकंद आधी अंतिम रेषा पार करीत पहिले स्थान मिळविले. रेड बुलच्या सर्जिओ पेरेझने चौथे, मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने पाचवे, सातवेळचा चॅम्पियन मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने सहावे, अल्फा रोमिओच्या व्हाल्टेरी बोटासने सातवे, अल्पाईनच्या एस्टेबन ओकॉनने आठवे, त्याचाच संघसहकारी फर्नांडो अलोन्सोने नववे, विल्यम्सच्या ऍलेक्स अल्बॉनने दहावे स्थान मिळवित एक गुण घेतला.