संप आंदोलनात सहभागी होण्यासाठी कृत्य
प्रतिनिधी / मिरज
राज्यभरात एसटी संप सुरू असताना मिरज आगारातून कोल्हापूर आणि पंढरपूर मार्गावर एसटी सेवा सुरू करण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. रविवारी कर्मचारी कामावर हजर झाल्याने एक एसटी कोल्हापूरकडे तर दुसरी एसटी पंढरपूरकडे रवाना झाली. मात्र कोल्हापूर येथे एसटीवर दगडफेक करण्यात आली तर पंढरपूर येथे एसटी चालकाला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. याबाबत संबंधित एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे अघोषित संप आंदोलन सुरू आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच मार्गावरच्या एसटी गाड्या पूर्णतः बंद होत्या. मात्र महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याने या कारवाईचा धसका घेऊन अनेक कर्मचारी एसटी सेवेत पूर्ववत हजर होताना दिसत आहेत. संप आंदोलनात सहभागी झालेल्या मिरज आगारातील 326 कर्मचाऱ्यांपैकी 30 हून अधिक कर्मचाऱ्यांनी रविवारी नियमीतपणे हजेरी लावली. कर्मचारी कामावर येत असल्याने कोल्हापूर, पंढरपूर, पुणे आणि सांगली मार्गावर एसटी सेवा सुरू करण्यात आली. मिरज आगारातून या एसटी रवाना झाल्या.
एसटी चालक आसिफ ए. मुल्ला आणि वाहक डी. पी. राजपूत हे मिरज – कोल्हापूर एसटी (एमएच – 20 बीएल – 0225) घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाले. तर चालक एस. आर. कोळी आणि वाहक एल. सी. पटेल हे एसटी (एमएच – 14 बीटी – 4026) घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले. सदर दोन्ही एसटी कोल्हापूर आणि पंढरपूरमध्ये दाखल होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये वाद उफाळून आला. एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी व्हा म्हणून काहींनी कोल्हापुरातील शिरोली येथे एसटीवर दगडफेक केली. यावेळी चालक जे. एस. मुल्ला हे जखमी झाले. यामध्ये एसटीच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. तर पंढरपूरकडे वारकरी प्रवाशांना घेऊन गेलेल्या एस. आर. कोळी या एसटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. संबंधित एसटी कर्मचाऱ्यांना त्याच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना एसटी आगार प्रशासनाने केल्या आहेत. पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मिरज एसटी आगार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.