मानसिंगराव कुमठेकर / मिरज
‘संगीत पंढरी’ अशी ओळख असलेल्या मिरज शहरात शंभर वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या संगीत सभांचे आयोजन केले जाते. नामवंत कलाकारांचे सादरीकरण आणि नेटके संयोजन यामुळे येथील संगीत कार्यक्रमांना रसिकांची पसंती असते. शहरात वर्षभर यशस्वीपणे संगीत सभांचे संयोजन करणार्या संयोजकांनी आता सीमोल्लंघन केले असून त्यांच्याकडून परराज्यातही संगीत महोत्सवांचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांत इथल्या संगीतसभांच्या संयोजकांनी तामीळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह महाराष्ट्राच्या विविध शहरांत जगभरातील नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मिरजेतील संगीतसभा संयोजकांच्या या प्रयत्नांना संगीत रसिकांनीही भरभरून दाद दिली आहे.
संगीत पंढरी मिरज..
मिरज ही संगीतशारदेचा वरदहस्त लाभलेली नगरी आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ इथे ग्वाल्हेर, किराणा यांसह अन्य घराण्याच्या कलाकारांची संगीतसेवा सुरू आहे. उत्तर हिंदुस्थानी संगीत महाराष्ट्रात आणणारे महादेवबुवा गोखले हे इथलेच. ग्वाल्हेर घराण्याचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी अनेक वर्षे इथल्याच भूमीच संगीतसेवा केली. त्यांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबरांनी गायनाचे धडे घेतले. याच शहरात विष्णू दिगंबरांकडे प्रो. बी. आर. देवधर, विनायकबुवा पटवर्धन यांसारखे दिग्गज कलाकार तयार झाले. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांनीही याच मिरजेत निळकंठबुवांकडून गायनाचे शिक्षण घेतले. मिरज नगरी ही किराणा घराण्याचे अध्वर्यु गायक संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ यांच्या 40 वर्षांच्या वास्तव्याने आणि सुरांनी न्हाऊन निघालेली नगरी. तंतुवाद्याचे माहेरघर अशीही या नगरीची जगभर ओळख. संगीत इथल्या कणाकणात रूजलंय. इथल्या जमिनीला कान लावले तरी सतारीचे झंकार ऐकू येतील आणि इथलं मूल रडलं तरी ते सूरातच रडेल, अशी या भूमीची ख्याती.
संगीत महोत्सवांनी गजबजते वर्ष
याच संगीतपंढरीत शंभर वर्षांहून अधिक काळ दरवर्षी विविध प्रसंगानिमित्त संगीत सभांचे आयोजन करण्यात येते. मिरासाहेब उरूसानिमित्त तीन दिवस होणारा संगीतरत्न अब्दूल करीम खाँ महोत्सव, अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात होणारा नवरात्र संगीत महोत्सव हे तर देशभर प्रसिध्द आहेत. याव्यतिरिक्त प्रसिध्द बासरीवादक पन्नालाल घोष, ख्यातनाम गायक विनायकबुवा पटवर्धन, ज्येष्ठ तंतुवाद्यनिर्माते उमरसाहेब मिरजकर, आबासाहेब सतारमेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानूदासबुवा गुरव यांच्या स्मृतिदिनी शहरात संगीतसभांचे आयोजन करण्यात येते. यासाठी दिग्गज गायक-वादक कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. वर्षभर होणार्या या संगीतसभा रसिकांनी मेजवानीच असतात.
संगीत सभांचे नेटके संयोजन
या सर्वच संगीत सभांच्या संयोजनात इथल्या तंतुवाद्य कारागिरांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या एका शब्दावर नामवंत कलाकार इथे येत असतात. संगीत सभांच्या संयोजनाचा अनेक वर्षांचा अनुभव या सतारमेकर व्यावसायिकांच्या पाठिशी आहे. मिरजेत यशस्वीरित्या होणार्या संगीत सभा पाहून अन्य राज्यातील संगीतप्रेमींनीही त्यांच्याकडे अशा संगीतसभा आयोजित करण्याच्या सूचना या सतारमेकर व्यावसायिकांना केल्या. त्यानुसार येथील संगीत सभेचे ज्येष्ठ संयोजक मजिद सतारमेकर, नौशाद सतारमेकर आणि नईम सतारमेकर यांनी संगीतसभा आयोजनाच्या मिरजेतील अनुभवाचा उपयोग करीत तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळसह महाराष्ट्रातील अन्य प्रमुख शहरात स्थानिक संगीतप्रेमींच्या मदतीने संगीत सभा आयोजित केल्या.
नामवंत कलाकारांचे कार्यक्रम
गेल्या चार वर्षांत ख्यातनाम बासरीवादक रोनू मुझुमदार, रूद्रवीणावादक बहाऊद्दीन डागर, सतारवादक रईसखान, प्रसिध्द सतारवादक मनू श्रीवास्तव (अमेरिका), तबलावादक नयन घोष, सतारवादक महेताब नियाझी (दिल्ली), व्हायोलियनवादक राजस-तेजस उपाध्याय यांसारख्या दिग्गजांचे कार्यक्रम चेन्नई, कोईमतूर, त्रिवेंद्रम, हैद्राबाद, बेंगलोर, कोल्हापूर येथे घेतले आहे. मिरजेतील संगीतसभा संयोजकांनी परराज्यात जाऊन तेथील रसिकांसाठी आयोजित केलेले हे कार्यक्रम तेथील संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरले आहेत.