कोरोना नियमांचा भंग, महापालिकेची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने मिरज-पंढरपूर रस्त्यावरील डि मार्ट मॉलला महापालिकेने 20 हजार रुपयांचा दंड केला. मंगळवारी महापालिका सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, आज दिवसभर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांडूनही पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. विनामास्क फिरणारे नागरिक, वाहनधारक, खासगी क्लासेस, मंगल कार्यालय, हॉटेल, किराणा दुकान, भाजी बाजार येथे कारवाई सुरू आहे. शुक्रवारी महापालिकेने डि मार्ट मॉलला नोटीस देऊन कोरोना नियमानुसार व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही मॉलमध्ये ग्राहकांची गर्दी करून तसेच कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसविल्याने सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी मॉलला 20 हजारांचा दंड करून तो वसुलही करण्यात आला. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना 5 हजारांचा दंड केला.