प्रतिनिधी/मिरज
शहरातील शिवाजी रोडवर असणाऱ्या एका प्रसिध्द डॉक्टराला कोरोनाची लागण झाली आहे. सदर डॉक्टराला कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल केले असून, रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रुग्णालय परिसरात तात्काळ कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. डॉक्टराला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने वैद्यकीय पंढरीत मात्र खळबळ उडाली आहे.
जिल्हाभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना अन्य तपासण्यांसाठी शहरातील सर्वच हॉस्पिटल सुरू आहेत. शिवाजी रोडवर सदर डॉक्टराचे प्रसिध्द रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, याच डॉक्टराला आता कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. रुग्णालयातील नोंदी तपासल्या जात आहेत. दरम्यान, रुग्णालयातील दाखल रुग्णांसह कर्मचारी अशा 23 जणांची तात्काळ क्वारंटाईन कक्षात रवानगी केली आहे. आरोग्य कर्मचाऱयांनी रुग्णालय परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.