सिटीस्कॅन मशीनमधील ट्युबा देतो म्हणून फसवले, नागपूर मधील एकावर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
सिटीस्कॅन मशिन मधील ट्यूबा देतो असे सांगून नागपूर येथील एका भामट्याने शहरातील डॉक्टराला तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. संतोष चंदू कुलगोड (वय ४७, रा. आदीलक्ष्मी अपार्टमेंट, गुलाबराव कॉलेज जवळ मिरज) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली असून, आली मोहम्मद जाफर (रा. नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. संतोष कुलगोड यांचे शहरातील गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज जवळ आदित्य डायग्नोस्टिक सेंटर नावाने हॉस्पिटल आहे. अली मोहम्मद जाफर याने डॉ. कुलगोड यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये एमआरआय सिटीस्कॅन मशीन मधील स्कफन व टयुबा देतो असे सांगून 12 लाख रुपये मागितले. त्यानुसार 27 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत डॉ. कुलगोड यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून सदरची रक्कम आली मोहम्मद जाफर याला दिली. मात्र आजतागायत जाफर याने सिटीस्कॅन मशिन मधील ट्युब व स्कफन दिले नाही. वारंवार चौकशी केली असता त्याने ठरल्याप्रमाणे टयुब आणि स्कफन देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. कुलगोड यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली आहे.