नशेखोराचे कृत्य, रेल्वेच्या काचा फुटल्या
प्रतिनिधी / मिरज
मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी दुपारी कोल्हापूर-तिरूपती एक्स्प्रेसवर नशेखोराने दगडफेक करून रेल्वेच्या काचा फोडल्या. रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी नदीम उर्फ खलनायक आजम खतीब (वय २५ रा.बुधवार पेठ, खतीब गल्ली) या नशेखोरास अटक केली आहे.
कोल्हापूर-तिरूपती एक्स्प्रेस ही मिरजेत आल्यानंतर एक्स्प्रेस गाडीचे इंजिन दुसर्या बोगीला जोडले जात होते. यावेळी अंजिन मागे घेत असताना नशेखोर नदीम उर्फ खलनायक खतीब याने रेल्वेवर दगड फेकले. यामध्ये इंजिनच्या काचा फुटल्या. रेल्वे चालकाने याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शिताफीने या नशेखोराला ताब्यात घेतले. त्याने नशेच्या अवस्थेत रेल्वेवर दगड फेकल्याची कबुली दिली. सदर नशेखोरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.