एक जण फरार, धारदार हत्यारे, लोखंडी रॉड, चटणीपूडसह अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / मिरज
शहरात जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या औरंगाबाद जिह्यातील चार जणांच्या टोळीला शहर पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे धारदार हत्या, कोयता, लोखंडी रॉड, चटणीपूड आदी साहित्यासह रोख रक्कम आणि मोबाईल असा अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी स्मशानभूमीत पाठलाग करुन या संशयीतांना पकडले आहे. दरम्यान, यातील एक संशयीत फरार झाला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये निमजी इगलीस काळे (वय 62), परारी उर्फ गागुली निमजी काळे (वय 19), सोमनाथ निमजी काळे (वय 20), विशाल निमजी काळे (वय 24, सर्व. रा. मु.पो.मारुती मंदिरजवळ, कोडगांव तांडा, धुपखेडा, ता. पैठण, जि. औरंगाबद) यांचा समावेश आहे. तर त्यांचा आणखी एक साथीदार सचिन निमजी काळे हा स्मशानभूमीतून पळून गेला आहे.
वाढत्या चोऱ्या आणि लुटमारी सारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि शहर पोलिस पेट्रॉलिंग करीत आहेत. पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील पाच संशयीत हे मिरज शास्त्री चौक ते म्हैसाळ रस्त्यावर वांडरे ट्रेडर्सनजीक चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या बसले असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता, सर्वजण तेथे जवळच असलेल्या स्मशानभूमीत पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता दरोड्यासाठी लागणारे धारदार हत्या, कोयता, लोखंडी रॉड, चटणीपूड आणि मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, फरार झालेल्या सचिन निमजी काळे याचा शोध सुरू आहे.