कवठेमहांकाळ तालुक्यातील एका तरुणास अटक
प्रतिनिधी/मिरज
शहरातील आंबेडकर उद्यानाजवळ पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक करुन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गणेश मोहन केंगार (वय 20, रा. जाकापूर, ता. कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूससह मोटारसायकल असा एक लाख, 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गणेश केंगार हा आंबेडकर उद्यानाजवळ (एमएच-10-सीवाय-5268) मोटारसायकल घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गांधी चौकी पोलिसांच्या पथकाने सापळा लावला होता. गणेश केंगार याला पकडून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे फॅक्टरी मेड पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस मिळून आले. सदर पिस्तूलाबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांनी सदर पिस्तूल आणि काडतूस हस्तगत केले. तसेच मोटारसायकलही जप्त केली. गणेश केंगार याला अटक करुन गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.