प्रतिनिधी / मिरज
शहरातील शास्त्री चौक येथे रविवारी रात्री दुकाने बंद करण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱया पोलिस कर्मचाऱ्यांना दोघा भावंडांनी अंगावर धावून जावून शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी किरण विलास साठे आणि सुरज विलास साठे या दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्याचे बिट मार्शल शास्त्री चौक येथे स्थानिक आस्थापना बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी एक बेकरी नियमापेक्षा जास्त उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संबंधीत बेकरी चालकाला बेकरी बंद करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी किरण साठे आणि सुरज साठे या दोघांनी पोलिसांशी वाद घातला.
दुकाने वेळेत बंद करण्यासाठी पोलिस आवाहन करीत असताना पोलिसांच्या अंगावर धावून जावून दमदाटी करण्यात आली. घडल्या प्रकारानंतर पोलिसांनी किरण आणि सुरज या दोघांना अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सदर दोघांवर मिरज शहर पोलिसात 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.