महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमणे काढली, हातगाड्याही जप्त, वादावादीचे प्रकार
प्रतिनिधी / मिरज
शहरातील प्रमुख मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडलेली बेवारस वाहने शनिवारी महापालिकेने ताब्यात घेतली. सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी चौकातून या मोहिमेला प्रारंभ झाला. महात्मा गांधी चौक रोड, गुरूवार पेठ, दर्गा रोड, माधव टॉकीज रोड, ब्राम्हणपुरी येथे अतिक्रमणे काढण्याबरोबर बेवारस वाहने आणि काही हातगाड्याही जप्त करण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण विभाग आणि मिरज शहर पोलिस ठाणे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. बेवारस वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलताना वाहन मालक आणि अधिकाऱ्यांच्यात वादावादीचे प्रकार घडले. महापालिकेच्या या धडक कारवाईने रस्त्यांवरील बेवारस वाहनांचा कचरा मात्र साफ झाला.