रुग्णाच्या नातेवाईकासोबत लज्जास्पद कृत्य, वैद्यकीय पंढरीला काळीमा
प्रतिनिधी / मिरज
शहरातील मातृमंदिर रुग्णालयात रुग्णासोबत आलेल्या महिला नातेवाईकाचा वॉर्डबॉयनेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधीत महिलेने बजरंग विभुते याच्यावर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय पंढरीला काळीमा फासला गेला आहे.
मातृमंदिर रुग्णालयात शहरातील म्हाडा कॉलनी येथील विवाहिता बाळंतपणासाठी आली होती. तिच्याबरोबर एक 35 वर्षीय नातेवाईक महिलाही होती. सदर महिलेने रुग्णाला चहा गरम करुन दिला. त्यानंतर ती बाहेर आली. त्यावेळी रुग्णालयात कार्यरत असणार्या बजरंग विभुते या कर्मचार्याने सदर महिलेला लज्जा उत्पन्न होईल, अशी अश्लिल भाषा करीत तिच्याशी गैरवर्तन केले. ही गोष्ट तिने घरच्यांना सांगितली.
त्यानंतर त्यांनी याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला ही माहिती दिली. मात्र, संबंधीत कर्मचारी हा त्या दिवसापासून फरार असल्याचे सांगण्यात आले. पिडीत महिलेने बजरंग विभुते याच्या विरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. बजरंग विभुते हा मातृमंदिर हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ माजली आहे. संबंधीत रुग्णालय हे महिलांच्या प्रसुतीसाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी महिला रुग्ण आणि त्यांच्याशी संबंधीत महिला नातेवाईकच असतात. त्यामुळे अशा रुग्णालयात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय पंढरीला काळीमा फासला गेला आहे.