सन १७७७ मधील सचित्र हस्तलिखित, मिरज इतिहास मंडळाच्या संग्रहात अमूल्य ठेवा
मानसिंगराव कुमठेकर / मिरज
मिरज येथे जुना वाडा पाडताना रामायणाचे सन १७७७ मधील पेशवेकालीन दुर्मिळ हस्तलिखित मिळाले आहे. या हस्तलिखितात रामायणातील सुंदर चित्रेही आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात हे हस्तलिखित दाखल झाले आहेत. मराठा कालीन चित्रशैलीची वैशिष्ट्ये या सचित्र हस्तलिखितावरुन उलगडतात.
मिरज शहरात ब्राह्मणपूरी येथे अनेक जुने वाडे आहेत. सध्या हे वाडे नामशेष होत आहेत. हे वाडे पाडून त्याजागी भव्य अशा सदनिका उभारल्या जात आहेत. असाच एक वाडा पाडताना मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना काही हस्तलिखिते आणि दुर्मिळ कागदपत्रे मिळाली. यामध्ये पेशवेकालीन आणि संस्थानकालीन मोडीलिपीतील कागदपत्रे आणि धार्मिक विधींची हस्तलिखिते यांचा समावेश आहे. पेशव्यांनी संबंधीत वाडा मालकाच्या पूर्वजांना दिलेल्या इनामाच्या सनदाही या कागदपत्रात होत्या. तसेच तत्कालीन सचित्र पंचांगेही या कागदपत्रांमध्ये होती. सदर वाडा मालकाने ही कागदपत्रे तेथेच एका मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिली होती. एका इतिहासप्रेमी नागरिकाने याची माहिती दिल्यानंतर कुमठेकर यांनी याठिकाणी धाव घेऊन ही कागदपत्रे ताब्यात घेतली.
या कागदपत्रांचा अभ्यास करीत असताना त्यामध्ये रामायणाचे एक सचित्र हस्तलिखित असल्याचे आढळून आले. या हस्तलिखिताच्या पानांवर सुंदर वेलबुट्टीचे नक्षीकाम चितारले आहे. तसेच रामायणातील प्रसंगांची सुंदर अशी लघुचित्रे त्यावर काढण्यात आली आहेत. यामध्ये रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजदरबारातले चित्र रेखाटण्यात आले आहे. यामध्ये राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांची सुंदर चित्रे रेखाटली आहेत. तत्कालीन मराठा चित्रशैलीची वैशिष्टये त्यातून उलगडतात. रामायणातील विविध कांडे यामध्ये असून, प्रत्येक कांडाच्या शेवटी वेलबुट्टीचे नक्षीकाम केले आहे. यातील चित्रांचे रंग हे नैसर्गिक पदार्थांपासून तयार केले असल्याने ते आजतागायत टिकून राहिले आहेत. तत्कालीन लघू चित्रशैलीची कल्पना या हस्तलिखितातील चित्रांवरुन होते. मराठा कालीन चित्रशैलीचा अभ्यास करण्यासाठी हे हस्तलिखित उपयोगी ठरणार आहे.
सदर हस्तलिखिताच्या शेवटच्या पानावर हस्तलिखिताचा लेखक आणि काळ लिहिला आहे. सदरचे हस्तलिखित एकटाकी सुंदर अशा हस्ताक्षरात लिहिले आहे. शालीवाहन शके 1699 हेमलंबी नाम संवत्सरे श्रावण वद्य नवमी बुधवारी, हे हस्तलिखित नारायण फडके नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हे हस्तलिखित 27 ऑगस्ट सन 1777 रोजी लिहून पूर्ण झाले आहे. पेशवेकालीन सचित्र हस्तलिखिताचा हा वैशिष्टय़पूर्ण नमुना आहे. तत्कालीन मराठा चित्रशैलीची ओळख रामायणाच्या या हस्तलिखितावरुन होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात हे हस्तलिखित दाखल झाले असून, मिरजेच्या इतिहासातील तो एक अमुल्य ठेवा बनला आहे.