प्रतिनिधी / मिरज
शहरातील प्रसिध्द तंतुवाद्य निर्माते संजय मधुकर मिरजकर (वय 42) यांनी सहा खासगी सावकारांकडून व्यवसायासाठी घेतलेल्या 50 लाखांच्या कर्जापोटी सावकारांनी तब्बल दोन कोटी रुपये वसूल केले. तरीही अद्याप 81 लाख रुपये येणे असल्याचे सांगत या सावकारांनी मिरजकर यांना दमदाटी आणि मारहाण केली. त्यामुळे मिरजकर हे भीतीपोटी बेपत्ता झाले होते. त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, सहा सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील आजवरच्या खासगी सावकारी प्रकरणातील सर्वात मोठी घटना आहे. यामुळे शहरात फोफावलेल्या खासगी सावकारीचे भयावह स्वरुप उघड झाले आहे.
गुन्हा दाखल झालेल्या सावकारांमध्ये संतोष महादेव कोळी, शंतनू महादेव कोळी (दोघे रा. माजी सैनिक वसाहत), सुरेश दादासाहेब लांडगे (सुंदरनगर), जितेंद्र अण्णासाहेब ढोले, शैलेश आण्णासाहेब ढोले (रा. भानू तालिम जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज), सूरज शहाजी दिवसे (रा. विजयनगर) यांचा समावेश आहे. यापैकी एकजण हा दिवंगत माजी नगरसेवकाचा पुत्र आहे. तर ढोले बंधू हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. याप्रकरणी विजय पाटगावकर याला अटक करण्यात आली आहे.
संजय मिरजकर हे तंतुवाद्य आणि ढोलताशांचे व्यावसायिक आहेत. त्यांनी 2016 ते 2018 च्या दरम्यान संबंधीत सहा सावकारांकडून वेळोवेळी एकूण 51 लाख, 50 हजार रुपये घेतले होते. सावकारांनी त्याच्यावर भरमसाठ व्याज आकारणी केली होती. व्याजापोटी मिरजकर यांनी या सावकारांना दोन कोटी, तीन लाख रुपये आजवर दिले आहेत. मात्र, तरीही 81 लाख रुपये येणे असल्याचे सांगत सदर सावकारांनी तगादा लावला होत. त्यांनी हे पैसे वसूल करण्यासाठी मिरजकर यांना फोनवरुन आणि प्रत्यक्ष दुकानात येऊन दमदाटी, धमकी देणे सुरू केले होते. तसेच त्यांना डांबून ठेवून मारहाणही केली होती. या सावकारांच्या छळाला कंटाळून संजय मिरजकर हे काही दिवस बेपत्ता झाले होते. बुधवारी ते परत आले. त्यांनी शहर पोलिसात या सावकारांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय मिरजकर यांनी 2016 मध्ये खासगी सावकार संतोष कोळी आणि शंतनू कोळी यांच्याकडून 15 लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. मात्र, अलीकडे वर्षभरात या व्याजाचा दर 40 टक्के करण्यात आला. आणि या 15 लाखांच्या कर्जाच्या बदल्यात कोळी बंधूंनी एक कोटी, चार लाख रुपये तीन वर्षात मिरजकर यांच्याकडून वसूल केले. मात्र, तरीही 35 लाख येणे बाकी असल्याचे सांगत कोळी बंधूंनी मिरजकर यांचा छळ केला. कोळी यांच्याकडे असलेले कामगार विजय पाटगावकर (रा. माजी सैनिक वसाहत), सूरज दिवसे (रा. विजयनगर), सचिन गायकवाड (रा. एमआयडीसी) यांच्यामार्फत दमदाटी, शिवीगाळ करण्यात आली. एकदा मिरजकर यांना उचलून नेऊन डांबून ठेवून मारहाणही करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मिरजकर यांनी 2017 साली सुरेश दादासाहेब लांडगे याच्याकडून दहा लाख रुपये प्रारंभी दहा टक्के दराने व नंतर 40 टक्के व्याजाने घेतले. मात्र, प्रत्यक्षात हे पैसे लांडगे याने मिरजकर यांच्या ताब्यात न देता ते सावकर संतोष कोळी याच्याकडे दिले. संतोष कोळी याने आपले मिरजकर यांच्याकडे येणे असलेले कर्ज भागविण्यासाठी हे पैसे वापरले. त्यानंतर सुरेश लांडगे याने मिरजकर यांना पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे दहा लाख रुपयांच्या बदल्यात मिरजकर यांनी दीड वर्षात 24 लाख रुपये दिले. तरीही अद्याप 15 लाख येणे शिल्लक आहेत, असे सांगत लांडगे याने मिरजकर यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच दुकानात जावूनही धमकी दिली.
भाजपाचे कार्यकर्ते असलेले जितेंद्र ढोले आणि शैलेंद्र ढोले या दोघा बंधूंनी राजकीय फायदा घेत सावकारी सुरू केली आहे. ढोले बंधू यांचे सामान्य रेशन दुकान होते. मात्र गेल्या तीन-चार वर्षात अचानक झालेली आर्थिक प्रगती ही अचंबित करणारी आहे. त्याचा उलगडा मिरजकर यांच्या फिर्यादीवरुन सर्वसामान्य नागरिकांना झाला. ढोले बंधू यांनी मिरजकर यांना 19 लाख रुपये दहा टक्के आणि 40 टक्के व्याज दराने दिले होते. त्याच्या बदल्यात मिरजकर यांनी 48 लाख रुपयांची फेड केली. तरीही 20 लाख रुपये येणे असल्याचे सांगत ढोले बंधूंनी मिरजकर यांच्याकडे तगादा लावला होता. तसेच सुरज दिवसे यांच्याकडून 2018 मध्ये मिरजकर यांनी साडेसात लाख रुपये कर्ज घेतले. त्याच्या बदल्यात मिरजकर यांनी 27 लाख रुपये दिले. परंतू अद्याप 11 लाख रुपये येणे असल्याचे सांगत आणि हे पैसे संतोष कोळी आणि शंतनू कोळी यांचे असल्याचे सांगत दिवसे याने मिरजकर यांना छळ आणि दमदाटी केली.
मिरजकर यांनी वरील सहा सावकारांकडून गेल्या तीन वर्षात 51 लाख, 50 हजार रुपये कर्जाऊ घेतले. त्यापोटी आत्तापर्यंत दोन कोटी, तीन लाख रुपये मिरजकर यांना मुद्दल आणि व्याजापोटी सावकारांना †िदले. मात्र, तरीही सावकारांनी 81 लाख रुपये येणे असल्याचे सांगत मिरजकर यांना दमदाटी, मारहाण करीत छळ सुरू केला होता. त्याला कंटाळून मिरजकर हे 15 दिवस बेपत्ता होते. मात्र, त्यांनी परत येऊन धाडस दाखवत सदर सावकारांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधीत सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील ही सर्वात मोठी सावकारीची घटना आहे. यामुळे खासगी सावकारीचा भयावह चेहरा उघडकीस आला आहे. पोलिसांनी अशा सावकारीला कडक प्रतिबंध घातला पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.