प्रतिनिधी/मिरज
सांगली जिह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या मिरज कोविड रुग्णालयातच कोरोना आजाराने कहर केला आहे. गुरूवारी रात्री उशिराने रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. यामध्ये काही डॉक्टर, नर्स आणि परिचारीकांचा समावेश आहे. कोविड सेंटरमधीलच कर्मचाऱ्यांना कोरानाची बाधा झाल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.
जिह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून येथे सांगलीसह कोल्हापूर आणि कर्नाटकातील काही रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या येथे तीनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दोनशे परिचारीक, 80 तज्ञ डॉक्टर आणि 150 हून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. यापूर्वीही कोरोना रुग्णालयातील अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. गुरूवारी रात्री उशिराने एकाच दिवशी 50 कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोविड सेंटर, अतिदक्षता विभागातील काही कर्मचाऱयांचा यामध्ये समावेश आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने या कर्मचाऱयांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडत असून, रुग्ण सेवेवरही परिणाम झाला आहे.