सभापती, उपसभापतींसह सदस्यांची 13 मार्चला मुदत संपली, बीडीओंकडे कार्यभार
प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीवर सोमवारपासून प्रशासक राज सुरु होत आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांच्याकडेच प्रशासक म्हणून कार्यभार देण्यात आला आहे. काही महिन्यांसाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका पुढे गेल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान सभापती, उपसभापतींसह सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.
मिरज पंचायत समितीची निवडणूक होऊन 13 मार्चला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासह अन्य काही कारणांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक पुढे गेली आहे. सदरच्या कालावधीत विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना मुदतवाढ मिळेल, अशी राजकीय पटलावर चर्चा सुरु होती. पण, त्यास शासनाने आदेश देऊन पूर्णविराम दिला. शासनाच्या एका आदेशान्वये सर्व पदाधिकारी ‘माजी’ झाले आहेत.